शु... सायबर गुन्हेगारांचे आहे लक्ष, रहा दक्ष! 

परशुराम कोकणे
सोमवार, 7 मे 2018

बॅंक खात्याची माहिती घेवून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांना सुमारे 3 लाखापर्यंत रक्कम परत मिळवून देण्यात शहर सायबर पोलिस ठाण्याला यश आले आहे. 2016 ते आजपर्यंत पोलिस ठाण्यांकडील गहाळ मोबाईल ट्रेसिंगला लावून 400 मोबाईल ट्रेस करून पुढील कारवाईकरीता पोलिस ठाण्यांकडे पाठविले आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना, सोशल मीडीयाचा वापर करताना दक्ष रहाण्याची आवश्‍यकता आहे. 
- मधुरा भास्कर, पोलिस उपनिरीक्षक, शहर सायबर पोलिस ठाणे 

हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम ऍपद्वारे सगळीकडेच ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. हे सारं होत असताना नकळत आपल्या खात्यावरून पैसे चोरण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी जाळं टाकून ठेवलं आहे. ऑनलाईन व्यवहार करताना आपली एखादी चुक फार महागात पडू शकते. जावू दे रे काही होत नाही... असं म्हणून आपण दुर्लक्ष केलं की झालंच... तुमची शिकार होणारचं..! स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्वांनाच दक्ष रहावं लागणार आहे.  

माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणकासोबतच हातातल्या स्मार्ट फोनने आपले स्थान निर्माण केले आहे. इंटरनेटचा वापर करुन इलेक्‍ट्रॉनिक डाटा ट्रान्सफर केला जात असतो. तसेच ई- बॅकिंग, पेपरलेस ऑफिस, सोशल मिडीया यासारख्या संकल्पना जन्माला आल्या. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हे करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बॅकिंग, ऑनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई- गव्हर्नस, फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, ट्‌विटर, व्हिडीओ कॉल या साऱ्या ऑनलाईन सुविधांचा आपण लाभ घेत आहोत. वाढत्या इंटरनेट वापराबरोबर सायबर गुन्हेगारांनी नवनवीन पध्दती शोधून लोकांचा पैसा आणि खासगी माहिती आणि गोपनियतेला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेट तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण सायबर पोलिस सक्षमपणे कार्यरत आहे. पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त महादेव तांबडे, गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर आणि त्यांच्या पथक कार्यरत आहे. पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस हवालदार विजयकुमार पावले, सलीम बागवान, पोलिस शिपाई व्यंकटेश मोरे, योगेश नरळे, मनिष पवार, रवी हाटखिळे, अनवर अत्तार यांची टीम कार्यरत आहे. 

सायबर गुन्ह्यांचे मुख्य प्रकार: 
- हॅकिंग 
- फिशिंग 
- सायबर स्टोकिंग 
- व्हायरस डेसिमीनेशन 
- क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड फ्रॉड 
- विवाह विषयक ऑनलाईन फसवणूक 
- विमा विषयक फसवणूक 
- ऑनलाईन खरेदीतून गंडविणे 
- वैयक्तिक माहितीची चोरी 
- नोकरीचे आमिष दाखवून लुट 

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय: 
- आपल्या संगणक व मोबाइलमध्ये एन्टी वायरस टाकुन घ्यावे व सतत अपडेट करावे. 
- आपले मोबाइल व संगणकाचे तसेच सोशल मीडियावरील अकाउंटचे पासवर्ड सतत बदलावे. 
- पासवर्ड हा साधारणपणे 8 ते 12 शब्दांचा असावा. ज्यामधे चुकूनही आपली जन्मदिनांक, नाव, गाडीचा नंबर, मोबाइल नंबर असू नये. 
- सुरक्षित सर्फिंग- ज्या लिंकची सुरुवात http ने होते अशा साइट्‌स/लिंक ओपन करू नये. ज्या लिंकची सुरुवात https (s-secure) ने होते तीच ओपन करावी. 
- अनोळखी व्यक्तिसोबत फेसबुक, व्हट्‌सअपवर चाटिंग करू ननये. तसेच वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. 
- सोशल मीडियावर अक्षेपार्ह मजकुर, फोटो, किंवा क्‍लिप पोस्ट करू नये. अन्य कोणीतरी आक्षेपार्ह पोस्ट टाकली असेल तर त्याला लाईक, कॉमेंट अथवा फॉरवर्ड करू नये. 
- सर्वानी पाहण्याजोगे नसलेले फोटो पोस्ट करू नये. 
- तुम्हाला ज्ञात नसलेल्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये किंवा स्विकारू नये. 
- क्रेडिट कार्डचा तपशील कोणासोबत ही शेयर करू नये. जसे की क्रेडिट कार्ड क्रमांक, चार अंकी पिन क्रमांक, एक्‍सपायरी डेट व कार्डच्या मागच्या बाजूला असलेल्या सीडब्लू क्रमांक आणि ओटीपी कोणाला सांगू नये. 

समजून घेणे अवाक्‍याबाहेर.. 
हॅकिंगचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे नैतिक (कायदेशीर मदत करणारा) दुसरा अनैतिक (बेकायदेशीर नियमांचे उल्लंघन करणारा). प्रत्येक वेळी हॅकिंग हे पैशासाठी केले जाते असे नाही, तर अनेकदा विकृत मनोवृत्ती असलेले हॅकर्स समाजात फूट पाडण्यासाठी किंवा विकृत आनंद मिळवण्यासाठी एखादी साईट किंवा डाटा हॅक करतात. अलीकडे सायबर गुन्हेगारी या संबंधित खूप मोठ्या प्रमाणावर वर्तमान पत्रात बातम्या वाचायला मिळत असल्याने सर्वसामान्य जनता काही प्रमाणात दक्ष झाली आहे, परंतू सायबर क्राइम अथवा सायबर हल्ला कसा झाला? त्याचे स्वरूप काय? त्यामुळे झालेले अथवा होणारे नुकसान? या काही बाबी मात्र समजून घेणे हे सर्वसामान्यांच्या अवाक्‍याबाहेरचे आहे. 

परस्पर अकाऊंटमधून पैसे होतात गायब.. 
फिशींग या प्रकारामध्ये इंटरनेटवर सर्वसामान्य लोकांना भुलवून किंवा घाबरवून अथवा फसवून त्यांचे नुकसान केले जाते. क्रेडिट कार्ड फ्रॉडमध्ये आपणास मोबाईलवर कॉल करून हे ऑनलाईन चोर आपल्याला सांगतात की, तुमचे कार्ड बंद पडणार आहे.. तर कार्ड बंद न करण्यासाठी कार्डचा नंबर विचारला जातो, नंतर त्याची एक्‍सपायरी डेट व मागील सीव्हीव्ही नंबर घेऊन आपल्या परस्पर अकाउंटमधून पैसे गायब व्हायला सुरू होतात. 

आकडे बोलतात.. 
ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याकडे फेसबुक संदर्भात मोहोळ, सांगोला, पंढरपूर तालुका, नातेपुते, वळसंग, वैराग, करमाळा, माळशिरस, अकलुज, बार्शी, अक्कलकोट उत्तर या पोलिस ठाण्यांकडून प्राप्त तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने महिला व शालेय मुला- मुलींच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 
प्राप्त तक्रारी- 45 
अर्ज निर्गती- 40 

बनावट अकाऊंटद्वारे मुलीची बदनामी 
टेंभूर्णी पोलीस ठाण्याकडे आलेल्या तक्रारीत एका मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्या मुलीचे मोबाईल नंबर बनावट फेसबुक अकाउंटवर शेअर करुन तिची बदनामी करण्यात आली होती. त्या मुलीला अनोळखी लोक फोनवरुन त्रास देण्यास सुरवात केली होती. याबाबतचा अर्ज सायबर पोलीस ठाण्याकडे आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी फेसबुक कंपनीशी ईमेल व्दारे तत्काळ संपर्क केला. तो फेसबुक अकाउंट कोणी काढला याबाबत माहिती घेण्यात आली. त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. फेसबुकच्या माध्यमातून अशा घटना नेहमीच घडत असतात, नागरिकांनी याबाबत तत्कार सायबर पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे यायला हवे. 

फेसबुक हॅक करून अश्‍लिल व्हिडीओ 
बार्शी शहर पोलिस ठाण्याकडे आलेल्या एका तक्रारीत महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्या अकाऊंटवरून अश्‍लील व्हिडीओ, फोटो महिलेच्या मित्र, मैत्रीनींना पाठविण्यात येत होते. मित्र, मैत्रिणींनी याबाबत सांगितल्यानंतर आपले फेसबुक हॅक झाल्याचे त्या महिलेला लक्षात आले. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्याकडे धाव घेतली. तक्रार केल्यानंतर कबाडे यांनी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क केला. हॅक केलेले अकाऊंट कोण वापरत आहे याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली. 

ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याकडे डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि ई वायलेट्‌सच्या फसवणूक संदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करून कारवाई केली जाते. 
प्राप्त तक्रारी अर्ज- 9 
तक्रारी अर्जांची निर्गती- 7 

सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रत्येकाने दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत सोलापुरात कमी गुन्ह्यांची नोंद आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर पोलिस ठाणे सक्षमपणे कार्यरत आहे. सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयातून जनजागृती होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 

आपल्या बॅंक खात्यासंदर्भात कोणालाही माहिती देवू नये. विशेषतः ओटीपी नंबर कोणालाही सांगू नये. बॅंकेने पाठवलेल्या मेसेजबद्दल शंका असल्यास बॅंकेस संपर्क साधावा. तसचे संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. 
- रवींद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, ग्रामीण सायबर पोलिस ठाणे 

बॅंक खात्याची माहिती घेवून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांना सुमारे 3 लाखापर्यंत रक्कम परत मिळवून देण्यात शहर सायबर पोलिस ठाण्याला यश आले आहे. 2016 ते आजपर्यंत पोलिस ठाण्यांकडील गहाळ मोबाईल ट्रेसिंगला लावून 400 मोबाईल ट्रेस करून पुढील कारवाईकरीता पोलिस ठाण्यांकडे पाठविले आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना, सोशल मीडीयाचा वापर करताना दक्ष रहाण्याची आवश्‍यकता आहे. 
- मधुरा भास्कर, पोलिस उपनिरीक्षक, शहर सायबर पोलिस ठाणे 

संगणक, संगणकाचे नेटवर्क, इलेक्‍टॉनिक डेटा स्टोरेज या उपकरणाद्वारे केलेल्या गुन्ह्यांना सायबर क्राइम असे संबोधले जाते. आजपर्यंत गुन्हे प्रत्यक्ष रुपात, शस्रच्या वापराने घडत होते, ते आता सायबर जगतातून बेमालूमपणे व कमीत कमी शारीरिक शक्ती वापरून घडत आहेत. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असल्याने अवघे जग मुठीत आल्यासारखे झाले आहे. स्मार्ट फोनमुळे बसल्या ठिकाणी आपण मोबाइल रिचार्ज ते महावितरण बिल भरणा करू शकतो तसेच पिक्‍चरच्या तिकीटापासून ते विमानाच्या तिकीटापर्यंत सारे व्यवहार ऑनलाइन होत आहेत. आता सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे. अनेक तरुणांना तर सोशल मीडीयाचे अक्षरशः याचे व्यसन लागले आहे. अशावेळी फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, ट्विटर व इन्स्टाग्राम या सारख्या सोशल साईट्‌चा चुकीचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे. आक्षेपार्ह गोष्टी शेअर केल्याने तणाव निर्माण होत आहे. यावर नियंत्रण आणताना पोलिसांची मात्र खूपच दमछाक होते. सायबर क्राईम हा विषय फार मोठा आहे. आम्ही या विषयावर प्रबोधन व्हावे म्हणून गेल्या वर्षी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सोलापुरातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती दिली आहे. यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर अणि पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी आम्हाला वेळावेगळी मार्गशन केले आहे. 
- प्रा. सारंग तारे, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber crime alert