सायकल चालवा; गुडघे वाचवा; डाॅ. अनंत जोशींचा स्वानुभवातून सल्ला

मतीन शेख
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

‘‘सायकलिंग हा माझा छंद आहे. गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा सायकलिंग व पोहणे उत्तम व्यायाम ठरू शकेल याचा विचार करून सायकल चालवू लागलो. ‘सायकल चालवा गुडघे वाचवा’ याची मी अनुभूती घेत आहे."

कोल्हापूर - ‘‘मी रुग्णांना औषध न देता व्यायामाचा उपयोग करून सांधेदुखी कमी करतो. हाडे मजबूत बनवून आयुष्यमान तंदुरुस्त करण्यासाठी सायकलचा उत्तम पर्याय आहे, त्याचा अनुभव मी घेतो आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी शंभर किलोमीटर सायकल चालवतो,’’ असा अनुभव प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनंत जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. अस्थिरोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. जोशी कोल्हापुरात आले आहेत. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सायकलिंग हा माझा छंद आहे. गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा सायकलिंग व पोहणे उत्तम व्यायाम ठरू शकेल याचा विचार करून सायकल चालवू लागलो. ‘सायकल चालवा गुडघे वाचवा’ याची मी अनुभूती घेत आहे. बऱ्याच वेळा मुंबई-पुणे, मुंबई-नाशिकसह अनेकदा शंभर किलोमीटर सायकल चालवली आहे. नियमित सायकल चालवत राहिलात तर सांधे उत्तम तयार होतात. सायकलिंगगमुळे आरोग्यात सकारात्मक बदल होतात. वजन जास्त असते तेव्हा गुडघे त्रास देतात, अशात सतत चालत राहिला तर गुडघे आणखी त्रास देऊ शकतात. यावर पर्याय म्हणून सायकलिंग करून वजन कमी करणे, वजन कमी करून नंतर चालणे उपयोगी पडते.’’

ते म्हणाले, ‘‘गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया हा अखेरचा पर्याय आहे. गुडघे त्रास जास्त देतात, तेव्हा डॉक्‍टरांकडे जाता तेव्हा ॲक्‍टिव्हिटी मॉडिफिकेशनचा सल्ला मिळतो. शौचालयास बसल्यानंतर वजनाचा भार गुडघ्यांवर येतो, तेव्हा गुडघे जास्त दुखतात म्हणून उंचावर बसा असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येते, तेव्हा ॲक्‍टिव्हिटी मॉडीफिकेशनचा सल्ला रुग्णांनी मानला पाहिजे.’’

शाकाहारी असा किंवा मांसाहारी; पण प्रमाण संतुलित ठेवा. गोड, तेलकट खात राहिले तर वजन वाढते. मग वजन कमी करण्यासाठी जास्त व्यायाम करावा लागतो. विशिष्ट वयानंतर व्यायाम झेपत नाही. त्यामुळे संतुलित खाणे किंवा व्यायाम आवश्‍यक आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवू नका. गाडी व्यवस्थित चालविली तर हादरे बसण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच पाठ, कमरेचे व्यायाम वेळोवेळी केले तर त्रास कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. अनंत जोशी,
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycling Removes Knee Pain Dr Anant Joshi Experience