Islampur : इस्लामपुरात खाकीवर ‘डाग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

islampur police

इस्लामपुरात खाकीवर ‘डाग’

sakal_logo
By
- शांताराम पाटील

इस्लामपूर : हादरून सोडणारी घटना या शहरात घडली. एका प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्यावर पोलिस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केले. त्याआधी त्याच्या प्रेयसीवर वाईट नजर ठेवली. सनक आणणाऱ्या एखाद्या ‘वेबसिरीज’ची पटकथा वाटावी इतका थरारक कारनामा एका खाकी वर्दीतील हैवाणाने केला. त्याच्या कृत्याने इस्लामपूर पोलिसांची बदनामी झालीच, शिवाय बेसीक पोलिसांकडे झालेल्या दुर्लक्षावरही आता उघड चर्चा सुरू झाली आहे.

सगळेच पोलिस वाईट नसतात, हे मान्यच, मात्र एखादाच इतका क्रूर, घातक आणि नासका निघतो की यंत्रणा हादरून जाते. कालपर्यंत इस्लामपूर पोलिस ठाणे आपल्या कारवाया, चांगली कामे ढोल वाजवत समाजासमोर ठेवत होते. अर्थात, काही प्रकरणांत पोलिसांची कारवाई आरंभशूर ठरत आल्याचे उघड दिसत होते. त्याचे पुढे काय होते, याविषयी अनेकदा प्रश्‍नही उपस्थित व्हायचे. इथंपर्यंत ठीक आहे, असे समजून सारे पुढे जात राहिले. महाविद्यालयीन युवकाला ब्लॅकमेल करीत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पोलिस हणमंत देवकर याने मात्र पोलिस विभागाची लक्तरे वेशीला टांगली.

मोका, तडीपारीसारख्या कारवाया करून आम्ही सजग आहे, असे पोलिस दाखवत आले. पुढे या कारवाया न्यायालयात किती टिकू शकल्या, यावर संशोधन करावे लागेल. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांतील आरोपीही सहज सुटत गेले. मोकासारख्या कारवाईत जामीन मिळत नाही, असे सामान्य माणसाचे कायद्याविषयीचे ज्ञान, इथे मात्र मोक्यातील लोक सुटले. ते कसे? त्यामुळे पोलिसांकडून योग्य कारवाई होत नाही का? जी होते ती दिखावा असते का, असे प्रश्‍न चर्चेत आले होतेच. त्यात या नव्या प्रकरणाने भर पडली आहे. प्रकरण वेगळे असले तरी गंभीर आहे.

हवालदार हणमंत देवकर याने खंडणी घेऊनही केलेल्या अनैसर्गिक कृत्याचा प्रताप इस्लामपूर पोलिसांवरच्या कारभारावर अंगुनी निर्देश करणारा आहे. काही काळापूर्वी पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावला होता. रस्त्यावर व गल्लीबोळात उतरत केलेल्या पोलिसिंगने जरब बसवली होती. नामचिन गुंड गायब झाले होते. त्यांनी आता परत डोके वर काढले आहे. शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात सावकारी फोफावली आहे. वसुलीसाठी गुंडाची फौज आहे. सावकार भट्टीचे कपडे घालून कुणासोबत फिरतात, हेही शोधावे. काहींची तर पोलिस ठाण्यात उठबस आहे. मटका नावालाच बंद आहे. हा सगळा हिशेब यानिमित्ताने खुलेआम जनतेच्या दरबारात चर्चेला आला आहे.

loading image
go to top