सोलापूर : सावधान... रोडरोमिओंवर दामिनीचा वॉच! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

साेलापूरमध्ये महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या दामिनी पथकाकडून गेल्या 20 दिवसांत 30 रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणांसह शाळा आणि महाविद्यालय परिसरात दामिनीच्या पथकाकडून वॉच ठेवला जात आहे.

सोलापूर : महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या दामिनी पथकाकडून गेल्या 20 दिवसांत 30 रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणांसह शाळा आणि महाविद्यालय परिसरात दामिनीच्या पथकाकडून वॉच ठेवला जात आहे. मुलींकडे पाहणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई केली जात आहे. 

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार महिला व विद्यार्थिनींना रोडरोमिओपासून संरक्षण मिळावे यासाठी या कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक हर्षा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथक कार्यरत असून गेल्या 20 दिवसांत दयानंद महाविद्यालयासमोर 12, शिवदारे कॉलेजसमोर सहा, वसुंधरा कॉलेजसमोर पाच, संगमेश्‍वर कॉलेजसमोर पाच आणि नॅशनल उर्दू शाळेसमोर दोन अशा एकूण 30 रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. 

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या प्रमुख महिला पोलिस उपनिरीक्षक हर्षा कांबळे, दामिनी एस. एन. डोळस, एम. नारंगकर, एस. जे. काटे, ज्योती शेरखाने, भाग्यश्री गुंड, ए. सी. जमादार, आर. व्ही. सोनवणे, आर. एस. पाटील आदी दामिनी पथकात कार्यरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damini group watch security situation in Solapur