esakal | हॉटस्पॉट जामखेडबाबत हा झालाय निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

This decision has been made regarding hotspot Jamkhed

आमदार पवार, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी जामखेडमध्ये कोरोनाग्रस्त परिसराची पाहणी केली. येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचीही पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना दिल्या. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण निघालेली नूरानी कॉलनीत आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चार पथकांनी "सारी'चे सर्वेक्षण सुरू केले अाहे.

हॉटस्पॉट जामखेडबाबत हा झालाय निर्णय

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : शहरातील सर्व नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा शासकीय यंत्रणेमार्फत पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली निरनिराळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्याचे कामही सुरू झाले. 

जामखेड येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांची झोप उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आमदार पवार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्याधिकारी संदीप सांगळे,  पोलिस उपअधीक्षक संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत जामखेड येथे बैठक झाली. 

या वेळी खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात "ई-सकाळ'मध्ये आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या माध्यमातून सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय झाला. 

हेही वाचा - काष्टी सोसायटीच घोटाळा ः पाचपुते-पिता पुत्रांकडून मॅनेजरला मारहाण

आमदार पवार, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी जामखेडमध्ये कोरोनाग्रस्त परिसराची पाहणी केली. येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचीही पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना दिल्या. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण निघालेली नूरानी कॉलनीत आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चार पथकांनी "सारी'चे सर्वेक्षण सुरू केले अाहे. त्यांचा अहवाल दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर होणार असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. 

जामखेडबाबत महत्त्वाचे निर्णय 

  • "हॉटस्पॉट' आहेच; त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर अधिक लक्ष देणार. 
  • संपूर्ण शहरात अत्यावश्‍यक सेवेचा पुरवठा शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत शुल्क आकारून सुरू करणार. 
  • ग्रामीण भागात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातच सेवा दिली जाणार आहे. 
  • ग्रामसेवकांनी सेवेच्या ठिकाणीच राहावे. जामखेडला येऊ नये. 
  • जामखेडमध्ये राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शहरातच ड्यूटी देण्याचे निश्‍चित. 
  • तालुक्‍यातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रवास करायचा नाही. 
  • नूरानी कॉलनीतील रहिवाशांचे "सारीचे सर्वेक्षण सुरू. 

जामखेडलगतची बीडमधील गावे "सील' 

जामखेडला कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा उपद्रव टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने जामखेडपासून अवघ्या चार किलोमीटरवरील सहा गावे अनिश्‍चित काळासाठी "सील' केली आहेत. या गावांमधून जामखेडला येणारे सर्व रस्ते खोदून बंद केले आहेत. 

जामखेडमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन, बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जामखेडमध्ये आतापर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जामखेड शहरापासून 4 किलोमीटरवरील गावे "सील' केली आहेत. त्यात हरीनारायण आष्टा, शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी,  कऱ्हे वडगाव व मातकुळी यांचा समावेश असून, या गावांचा परिसर "बफर झोन' म्हणून घोषित केला आहे. ही गावे अनिश्‍चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात आली आहेत.