पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनिमित्त फुलांची सजावट

अभय जोशी
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- प्रक्षाळ पूजोनिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी करण्यात आली सजावट.

पंढरपूर : प्रक्षाळ पूजोनिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. मोसंबी आणि सफरचंदाची तोरणे गाभाऱ्यात लावण्यात आली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणीला आकर्षक अलंकार घालण्यात आले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी देवाचा पलंग काढून ठेवण्याची प्रथा आहे. यात्राकाळात देव भाविकांसाठी अहोरात्र उभा असतो. यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा केली जाते. संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन स्वच्छ केले जाते.

 देवाचा थकवा दूर व्हावा यासाठी श्री विठ्ठलाला तेल लावले जाते आणि विविध वनस्पतींपासून बनवलेला काढा देवाला दाखवण्यात येतो. 

पुण्यातील फूलवाले प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांनी सजावट करत असतात. यंदा देखील अमोल शेरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून फुलांची आकर्षक सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सभामंडप, श्री संत नामदेव महाद्वार अशा सर्वच भागात विविध फुलांनी सजावट करण्यात आली. 

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी च्या गाभाऱ्यात सफरचंद आणि मोसंबी यांची तोरणे लावण्यात आली आहेत. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर शकुंतला बडगिरे यांच्या हस्ते श्री रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decoration with Flowers on Vitthal Rukmini Temple