esakal | पदवी महाविद्यालये पुन्हा गजबजली
sakal

बोलून बातमी शोधा

College Student

Belgaum : पदवी महाविद्यालये पुन्हा गजबजली

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : शहरातील पदवी महाविद्यालयांना सोमवार (ता.४) पासून सुरुवात झाली आहे. यामुळे सोमवारी महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. मात्र, प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अध्यापही विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला नसल्याने अभ्यासक्रम अपलोड होईपर्यंत या विद्यार्थ्यांना काय शिकविले जाणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यामुळे विद्यापीठाने तातडीने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपलोड करावा अशी मागणी होत आहे.

राणी चन्नमा विद्यापीठाने गेल्या महिन्यात एक पत्रक काढून पदवी महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याच्या सुचना महाविद्यालयांना केल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन वर्गांना मंगळवार (ता.५) पासून सुरुवात होणार आहे. पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जुनाच असेल तर दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम गेल्याच वर्षी बनविण्यात आला आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी यंदापासून राष्ट्रीय शिक्षण निती लागु करण्यात आली आहे.

यामुळे यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाने सध्या थोडा अभ्यासक्रम आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. मात्र, अजूनही अभ्यासक्रम अपलोड होण्याची गरज आहे. प्रथम वर्षातील सर्व अभ्यासक्रम वेबसाईटवर येण्यासाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अभ्यासक्रम तयार नसेल तर विद्यापीठाने घाईगडबड करून महाविद्यालये सुरु करण्याची गरज होती काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मागील वर्ष संपले

गेल्या पंधरा दिवसांपासून पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा सुरु होत्या. त्या परीक्षा सोमवारी (ता.४) संपल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. काही ठिकाणी गुलालाची उधळणही करण्यात आली. पुढील वर्षालाही आता सुरुवात झाली आहे.

loading image
go to top