सोलापूर महापालिका परिवहन विभागाचे खासगीकरण करण्याची मागणी

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 22 मार्च 2018

उत्पन्न कमी, खर्च जास्त, बसची संख्या कमी आणि सुट्या भागाच्या किंमतीत वाढ यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे.

सोलापूर - सातत्याने होणारा तोटा आणि उपक्रमावर वाढत चाललेला बोजा पाहता महापालिका परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करावे किंवा ते एसटी महामंडळाकडे हस्तांतरीत करावे, अशी शिफारस व्यवस्थापकांनी केली आहे. 

परिवहन उपक्रमावर आजच्या घडीला 32 कोटी 58 लाख रुपये देणे आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न बसल्याने त्याचा बसच्या देखभाल व दुरुस्तीवर परिणाम होऊन बसची संख्या कमी होत गेली आहे. उत्पन्न कमी, खर्च जास्त, बसची संख्या कमी आणि सुट्या भागाच्या किंमतीत वाढ यामुळे उपक्रमाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षांत परिवहन उपक्रमाला 24 कोटी 93 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे, तर खर्च 30 कोटी 18 लाख रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास सव्वापाच कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. याशिवाय, 2017-18 अखेर 32 कोटी 92 रुपयांचे कर्ज उपक्रमावर आहे. आजची आर्थिक स्थिती पाहता उपक्रमाचे खासगीकरण करणे, एसटी महामंडळाकडे वर्ग करणे किंवा महापालिकडून भरीव निधी घेणे हे तीन उपाय करावे लागणार आहेत. या उपायांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास उपक्रमाची आर्थिक स्थिती आणखी ढासळणार आहे, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

आजच्या घडीला 36 बस मार्गावर असून त्यापासून दरमहा 64 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. 2009-2014 या कालावधीत उत्पन्नाचा साकल्याने विचार न करता मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांना कायम करण्यात आले आहे. काही कर्मचारी शारीरिक दृष्ट्या अपात्र झाल्याने त्यांना इतर कामे देण्यात आली आहेत. त्याचाही फटका उपक्रमाला बसत आहे. आर्थिक ताण पडून 
वेतनावरील खर्च हा उत्पन्नापेक्षा दीडपट झाला आहे. चालक नसल्याने सात बस वापरात नाहीत. सध्या सात महिन्यांचा पगार आणि पाच महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन थकीत आहे. आजच्या घडीला प्रती किलोमीटरला 22 रुपये 55 पैसे उत्पन्न मिळत आहे, तर 51.33 पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे प्रती किलोमीटर 28 रुपये 78 पैसे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर उपक्रमाचे खासगीकरण करणे किंवा एसटी महामंडळाकडे वर्ग करणे हाच उपाय असेल, असेही शिफारसीत म्हटले आहे.

परिवहनमधील सध्याचा ताफा - 
टाटा मिडी - 59
मिनी बस - 35
जनबस - 99
व्हाल्व्हो - 10
एकूण - 203
मार्गावर - 36
 

Web Title: Demand for privatization of Solapur Municipal Transport Department