सदाभाऊ खोत यांच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

सांगली - कडकनाथ कोंबडी प्रकरणी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या आंदोलकांना धमकीची भाषा वापरली आहे. असंसदीय भाषेत दम दिला आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. 

सांगली - कडकनाथ कोंबडी प्रकरणी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या आंदोलकांना धमकीची भाषा वापरली आहे. असंसदीय भाषेत दम दिला आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. 

सांगली सुधार समितीचे अमित शिंदे, तसेच दिग्विजय चव्हाण, सुभाष पाटील, प्रहार संघटनेचे सुनिल सुतार, शाकीर तांबोळी, विवेक गुरव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. इस्लामपूर येथे शनिवारी सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत त्यांनी खोत यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. 

श्री. शिंदे म्हणाले, ""खोत यांनी पत्रकार परिषदेत असंसदिय भाषा वापरली. त्यांनी एका अर्थाने आंदोलनातील कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खोत यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आमच्यापैकी कुणाच्याही केसाला धक्का लागला तर त्याला मंत्री खोत जबाबदार असतील. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस अधीक्षकांनी आदेश द्यावेत. त्यांनी आदेश दिले नाही तर आम्ही पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून न्यायालयात जावू.'' 

सुभाष पाटील म्हणाले, ""चळवळीतील कार्यकर्त्याला धमकी देऊन त्यांचा आवाज दाबता येतो, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. महाराष्ट्रताली चळवळीचा कार्यकर्ता साऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.'' 

दिग्विजय चव्हाण म्हणाले,""मंत्री खोत यांनी माझ्या भावाला फोन करून एकप्रकारे माझ्या कुटुंबावर दबाव टाकला आहे. आम्ही मागे हटणारे नाही. कडकनाथ कोंबडी प्रकरणी पोळलेल्या लोकांना न्याय देऊन थांबू. मंत्री खोत यांनी आपले कर्तव्य आधी पार पाडावे. या कोंबड्यांना तातडीने खाद्य देण्याची व्यवस्था करावी. अंडी खरेदीचे धोरण ठरवावे.'' 

सुनिल सुतार म्हणाले, ""शेतकऱ्यांना न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आमचा आवाज दाबवण्यापेक्षा मंत्री खोत यांनी गरीब शेतकरी पुत्रांच्या हक्कासाठी पुढाकार घ्यावा.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Resignation of Minister Sadabhau Khot