
एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून पैशांची मागणी
बेळगाव - लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे (एसीबी) सांगत शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणाऱ्या कोल्हापूर येथील एका तोतया एसीबी अधिकाऱ्यांसह तिघांना अटक केली आहे. मंगळवार (ता. १४) सायबर एकोनोमिक्स नारकोटिक्स पोलिसानी (सीईएन) ही कारवाई केली आहे.
मुरीगेप्पा निंगाप्पा कुंभार (रा.कुंभार गल्ली सदलगा ता. चिकोडी) राजेश बापुसो चौगुले (रा. बस्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि रजनीकांत नागराज (एम. एन. रजनीकांत) (रा. मुगळी, ता. सकलेशपुर, जि. हसन) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया एसीबी अधिकाऱ्यांची नावे आहेत. तोतया एसीबी अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ विभागीय परिवहन अधिकारी (आरटीओ) इरण्णा रामण्णावर यांनी (सीईएन) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून आज वरील तिघा संशयितांना अटक केली आहे. आम्ही एसीबी अधिकारी आहोत. तुमच्या विरोधात आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरावर तसेच कार्यालयावर छापे टाकले जातील. आपल्या खात्यात पैसे जमा केले नाहीत तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील, अशी धमकी ते आरटीओ, उपनोंदनी अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी त्याचबरोबर विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना देत होते. आपल्या बँक खात्यात तातडीने पैसे जमा न केल्यास तुमच्यावर छापेमारी केली जाईल, अशी धमकीही देखील ते देत होते. असे पोलिसांनी सांगितले.
वरील तिघात तोतया एसीबी अधिकाऱ्यानी आतापर्यंत किती जणांना गंडविले आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी वरील तिघांना न्यायालयासमोर हजर करून त्यांना पुन्हा पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे. एसीबी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Demanding Money By Threatening Government Officials Claiming To Be Acb Officials
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..