हाथरस बलात्कारप्रकरणी पाचशे गावांत निदर्शने; "श्रमिक'चे आंदोलन

जयसिंग कुंभार
Tuesday, 6 October 2020

उत्तरप्रदेशातील हाथरसमधील बलात्कार व हत्याकांडाचा आज श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने राज्यभर निषेध नोंदवण्यात आला. सुमारे पाचशे गावांमधील कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरासमोर निषेध फलक दाखवत निदर्शने केली.

सांगली : उत्तरप्रदेशातील हाथरसमधील बलात्कार व हत्याकांडाचा आज श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने राज्यभर निषेध नोंदवण्यात आला. सुमारे पाचशे गावांमधील कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरासमोर निषेध फलक दाखवत निदर्शने केली. उत्तरप्रदेश सरकार व प्रशासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. 

श्रमिक मुक्ती दलाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावातील कार्यकर्ते, महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला. युवतीवरील बलात्कार, यानंतर तिची जीभ छाटने, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाऱ्या घटना संशयास्पद आहेतच . ही घटना काही पहिलीच नाही, चाळीस वर्षांपूर्वी बिहार मध्ये जी बेलची गावात घटना घडली

तिथपासून ते महाराष्ट्रातील खैरलांजी ते हाथरस पर्यंतच्या हजारो घटना घडत आहेत, आणि त्या वाढतच चालल्या आहेत. म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या घटनांना आळा घालण्यासाठी हे आंदोलन आहे, अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाने घेतली आहे. 
श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.भारत पाटणकर म्हणाले,"" खरं तर ही घटना केवळ बलात्काराची नाही तर त्यामागे जातवर्चस्व आणि जातीय अहंकार त्यामागे आहे.

गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे पण याबरोबरच जातीय आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे तरच या घटना कायमच्या थांबणार आहेत. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.''. 

आज राज्यभरात ठिकठिकाणी डॉपाटणकर, संपत देसाई, डॉ प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी के बोडके, मेजर बन, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonstrations in 500 villages over Hathras rape case by shramik mukti dal