Maize : अग्रण धुळगाव बनले ‘मका हब’

कृषी विभागाच्या पुढाकाराने घेतले एकरी ६० क्विंटल उत्पादन
Maize
Maizesakal
Updated on

रांजणी : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे २०२० पर्यंत मका पिकाचे उत्पादन सरासरी एकरी २० क्विंटल होते. कितीही कष्ट घेतले तरी जास्तीत जास्त एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळत होते. नंतर पीक पद्धतीत अामूलाग्र बदल झाला.

जून २०२० मध्ये कृषी सहायक जी. ए. अजेटराव येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी गावचे SWAT Analysis केला. उपविभागीय कृषी अधिकारी एम. डी. वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मका उत्पादन एकरी ६० क्विंटलपर्यंत गेले आहे.

गावचे भौगोलिक क्षेत्र १८०९.८८ हेक्टर आहे. वहिवाटीखालील क्षेत्र १५८९.०० हेक्टर आहे. सन २०१८ पर्यंत गावाची ओळख दुष्काळी अशीच होती. दरवर्षी ऑक्टोबरपासून जूनपर्यंत टॅंकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असे. सन २०१९ मध्ये अग्रणी नदी पुनरुज्जीवित करण्याचे काम झाल्यानंतर हळूहळू बदल होत गेला.

जून २०२१ मध्ये मका उत्पादन घेण्यासाठी रणनीती आखण्यात आली. शेतकरी निवड करीत असताना आत्मविश्वास व सुविधा असलेल्या १० शेतकऱ्यांची निवड केली. जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड करण्यात आली. अंतर ६० x २० सेंटिमीटर ठेवून पेरणी करण्याअगोदर बियाणास बुरशीनाशक, कीटकनाशकांचा वापर व बीज प्रक्रिया करून जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करण्यात आली. पेरणी करताना १०:२६:२६ हे खत १०८ किलो, झिंक सल्फेट १० किलो आणि युरिया ३ किलो ही खते देण्यात आली. पेरणीनंतर ७२ तासांत तणनाशकाची फवारणी केली.

खत व पाणी व्यवस्थापन

मका पीक चार पानावर असताना एकरी ३३ किलो युरिया, आठ पानावर असताना एकरी ४० किलो युरिया, तुरा अवस्थेत असताना एकरी २७ किलो युरिया, दाणे भरत असताना एकरी सात किलो युरिया देण्यात आला. खत दिल्यानंतर पाठोपाठ पाणी देण्यात आले.

कीड व रोग व्यवस्थापन

पेरणीनंतर लष्करी अळी नियंत्रणासाठी एकरी चार कामगंध सापळे लावण्यात आले. लष्करी अळीच्या पतंगांचा अटकाव करण्यासाठी बांधावर ‘नेपियर’ची लागवड करण्यात आली. पीक दोन ते तीन पानांवर असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली. पीक चार ते पाच पानांवर असताना निंबोळी अर्क व क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथ्रींची फवारणी करण्यात आली. दहा-बारा पानावर असताना इमामेक्टिन बेंजोएटचे फवारणी केली. दर पंधरा दिवसांनी अंडा अमिनो ॲसिड या संजीवकाची दोन वेळा फवारणी केल्यामुळे पानांचा आकार व रोपाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली.

अग्रण धुळगाव ‘मका हब’

दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी मका पिकाकडे फक्त जनावरांसाठी चारा अशा दृष्टीने पाहिले जात होते. त्या ठिकाणी सन २०२२ मध्ये पेरणी क्षेत्र २२० हेक्टर झाले. एक गाव-एक वाण या योजनेंतर्गत जवळपास ४० हेक्टर क्षेत्रावर एकाच वाणाची लागवड करण्यात आली. त्यामुळे अग्रण धुळगाव ‘मका हब’ बनले आहे.

व्यापाऱ्यांचेही लक्ष

सांगली जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची मागणी ही ५० हजार टनाची आहे. ही गरज भागवण्यासाठी बाहेरील राज्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधून मका आणला जातो. एक वाण, रंग, आकार व दर्जाचा मका मोठ्या प्रमाणावर एकाच गावातून मिळणार असल्यामुळे जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लक्ष अग्रण धुळगावकडे आहे. अशा प्रकारे ५०० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणावरून मका मिळणार असेल तर व्यापारी जादा दराने मका घेण्यास तयार आहेत.

चार महिन्यांत शेतकरी लखपती

शेतकऱ्यांचे एकरी ५० क्विंटल उत्पादन आले आणि दर किमान २५ रुपये मिळाला तरी शेतकऱ्यास चार महिन्यांत १ लाख २५ हजार रुपये मिळू शकतात. उसापेक्षा परवडणारे म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते आहे. कृषी सहायक जी. ए. अजेटराव यांचे सहकार्य व तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर व उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांचे मार्गदर्शन यामुळे चार महिन्यांत शेतकरी लखपती बनवून शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करता आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com