राज्यातील सत्ता बदलानंतर पोलिस दलात बदल्यांचे वेध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

भाजपने त्यांच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्याचा राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रासही झाला होता. त्यामुळे आता हे चित्र बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही संधी आहे. त्यामुळे त्या-त्या तालुक्‍यात इच्छुक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय पातळीवरील हालचालींबरोबरच संबंधित लोकप्रतिनिधींची मर्जी आपल्यावर राहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सातारा : सत्ता बदलानंतर आता पहिल्यांदाच बदल्यांचे दिवस जवळ येवू लागले आहेत. त्यामुळे विविध विभागांतील अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. त्याचप्रमाणे कार्यकाळ संपलेल्या पोलिसांनाही आता योग्य ठिकाणच्या बदल्यांचे वेध सतावू लागले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच चाचपणी करायला सुरवात केली आहे. 

शासकीय नियमानुसार दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा काळ सुरू होतो. परंतु, त्यासाठीची शासकीय प्रक्रिया मार्च महिन्यापासूनच सुरू होते. त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर बदलीपात्र व इच्छुक कर्मचारीही या प्रक्रियांमध्ये काय होणार, याकडे लक्ष ठेवून आहेत. राज्यामध्ये युतीचे शासन जावून आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. प्रत्येक सत्ताधारी हे राज्य कारभार चालविण्यासाठी आपल्याला सोयीस्कर अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी नियुक्‍त्या करत असतात. त्यानुसार भाजपच्या कार्यकाळातही बदल्या करण्यात आल्या होत्या. आता भाजपचे सरकार जावून महाविकास आघाडीचे शासन आले आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यादृष्टीने आवश्‍यक असलेल्या बदल्या करण्याचा काळ आता आला आहे. राज्य कारभाराच्या सोयीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या यापूर्वीच झाल्या आहेत. परंतु, मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे काम हे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत होणार आहे. 
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचा आघाडी सरकारच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नेहमी प्रभाव राहिलेला होता. मागील पाच वर्षांत मात्र हे चित्र बदलले होते. भाजपने त्यांच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्याचा राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रासही झाला होता. त्यामुळे आता हे चित्र बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही संधी आहे. त्यामुळे त्या-त्या तालुक्‍यात इच्छुक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय पातळीवरील हालचालींबरोबरच संबंधित लोकप्रतिनिधींची मर्जी आपल्यावर राहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये महसूल, गृह, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींची पत्रे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी विविध खात्याच्या मंत्र्यांची चाचपणी सुरू केली आहे. त्यातच जिल्ह्याला राष्ट्रवादी व शिवसेनेच्या माध्यमातून दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे या मंत्र्यांचाही आपल्याला लाभ करून घेता येतोय का, यासाठीही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. पोलिस दलामध्येही आता बदल्यांची उत्सुकता वाढली आहे. 

जरुर वाचा : राजे की राजकारणी ? जबाब द्या

सहा वर्षे एका ठिकाणी असलेल्यांची बदली 

सहा वर्षे एकाच ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने आगामी काळात बदली होणार असते. त्याचबरोबर विनंती अर्जावरूनही काही बदल्या होत असतात. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनाही आता बदल्यांची चाहूल सतावू लागली आहे. कोणते ठिकाण आपल्याला सोयीस्कर ठरेल, त्यासाठी काय करावे लागेल, याची चाचपणी पोलिस कर्मचाऱ्यांकडूनही सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी महिना बदल्यांसाठी महत्त्वपूर्ण हालचालींचा राहणार आहे.

हेही वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department Of Police Keen Interest For Transfers In State