लॉकडाऊन असतानाही पलूस तालुक्‍याने दिला सव्वा कोटी महसूल 

संजय गणेशकर
Tuesday, 28 July 2020

खरेदी- विक्री दस्त व इतर व्यवहारातून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शासनास तब्बल 1 कोटी 34 लाख, 96 हजाराचा महसूल जमा झाला आहे.

पलूस : सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने खरेदी-विक्री व्यवहार ठप्प आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सुध्दा गेल्या दोन महिन्यात खरेदी- विक्री दस्त व इतर व्यवहारातून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शासनास तब्बल 1 कोटी 34 लाख, 96 हजाराचा महसूल जमा झाला आहे. यावरुन पलूस तालुक्‍यात कोट्यवधीचे विविध व्यवहार झाले असल्याचे स्पष्ट होते. 

पलूस तालुका सधन तालुका समजला जातो. पलूससह इतर ठिकाणच्या जमिनिच्या किंमती गगणाला जाऊन भिडल्या आहेत. तरिही गेल्या 15 ते 20 वर्षापासून याठिकाणी कोट्यवधी रुपयांचे खरेदी- विक्रिचे अनेक व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयाचे माध्यमातून झाले आहेत. पलूस मध्ये एक गुंठा प्लॉंटचा दर मोक्‍याच्या ठिकाणी असेल तर दहा लालाखांपासून पन्नास लाखापर्यंत आहे. शेत जमिनिचे दरही वाढले आहेत. याशिवाय विविध अपार्टमेंटमध्ये असणारे फ्लॅट, घरे यांच्या किंमतीही मोठ्या शहरांइतक्‍याच आहेत. 

पलूस हे तालुक्‍याचे शहर आहे. नगरपालिका आहे. औद्योगिक वसाहत, शिक्षणाच्या सुविधा, इतर सोयी, तासगाव- कराड मार्गावरील शहर यामुळे जागा खरेदी करून याठिकाणीच स्थायिक होऊन, नोकरी, उद्योग-व्यवसाय करण्याकडे बाहेरून येणाऱ्या लोकांचा कल प्रथमपासूनच आहे. 

कोरोनाचे पार्श्वभूमीवर ता.23 मार्च ते ता.27 मे पर्यंत लॉकडाऊन होते. त्या कालावधीत शासकीय कार्यालये बंद होती. लॉकडाऊन मुळे उद्योग- व्यवसाय तोट्यात आले. असे असतानाही पलूस दुय्यम निबंधक कार्यालयात ता.28 मे ते ता.23 जुलै या दोन महिण्याच्या कालावधीत एकूण 485 दस्त झाले. त्यामध्ये खरेदी-विक्री, तारण गहाण,अदलाबदल,वाटणी पत्र, हक्क सोड,साठेखत,भाडेपट्टा आदिंचा समावेश आहे.रजिस्ट्रेशन फी व नोंदणी( मुद्रांक ) फी मिळून दोन महिन्यात पलूस तालुक्‍यातून शासनास दुय्यम निबंधक कार्यालयाकडून तब्बल 1 कोटी,34 लाख,96 हजार,260 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे लॉंकडाऊन परिस्थिती मध्ये सुद्धा महसूल ईतक्‍या मोठ्या प्रमाणावर जमा झाला असेल, तर प्रत्यक्ष व्यवहार कितीतरी कोटींच्या घरात झाले असतील. हे स्पष्ट होते. 

पलूस तालुक्‍यात लॉंकडाऊन परिस्थितीत सुध्दा भरपूर दस्त होत आहेत. मात्र, नोंदणी विभागाचा सर्व्हर डाऊन असणे,एल.आर.सर्व्हर उपलब्ध नसणे,नेट उपलब्ध नसणे यामुळे दस्त करण्यास विलंब होत आहे. 

- व्ही. डी.कासेवाड,दुय्यम निबंधक, पलूस 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the lockdown, Palus taluka paid Rs