बेळगावात अंत्यसंस्कार करण्यासाठी आली 'ही' वेळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

समाजमाध्यमांवर व्हिडिओ चित्रण झाले व्हायरल

बेळगाव : महानगरपालिकेच्या सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दाहिन्या कमी पडू लागल्याने जागा मिळेल, तेथे अंत्यसंस्कार करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. खुल्या जागेत चिता रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याचे व्हिडिओ चित्रण केले असून ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. एकाचवेळी २८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचे त्या व्हिडिओत दाखविले आहे. यावरुन कोरोनासमोर प्रशासकीय व महापालिका यंत्रणा हतबल झाल्याचे दिसते. 

हेही वाचा - ...तर सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टी यांचा इशारा

कोरोनाबाधितांवर सदाशिवनगर स्मशानभूमी व अंजुनम-ए-इस्लाममधील दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे प्रमाण जास्त आहे. आरोग्य विभागाच्या शिष्टाचारानुसार मोजकेच नातेवाईक व महापालिका आरोग्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचारी पीपीई कीट घालूनच अंत्यसंस्कार करतात. 

नैसर्गिक मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीतच रक्षा विसर्जन कार्यक्रम केला जातो. पण, कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रक्षा विसर्जन करता येत नसल्याने त्यांची राख व अस्थी स्मशानभूमीतच आहेत. ते हटविण्याचे कामही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. यावरुन बेळगावात मरण स्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांवर डिझेल दाहिनीतच अंत्यसंस्कार करण्याचा आरोग्य विभागाचा आदेश होता. त्यानुसार सदाशिवनगरमधील स्मशानभूमीत डिझेल दाहिनी सुरु करण्यात आली. 

हेही वाचा - कोरोना रूग्णांना दिली जाणार कथा, कादंबरी, विनोदी पुस्तके...

जुलैच्या प्रारंभी शास्त्रीनगरमधील कोरोनाबाधित मृतांवर सर्वप्रथम डिझेल दाहीनीत अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर बाधीतांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी अन्य दाहिन्यांचा वापर सुरु झाला आहे. आता त्या दाहिन्याही कमी पडू लागल्या आहेत. आधी दुपारी दीडपर्यंतच कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते. आता तीनपर्यंत अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेचे आरोग्याधिकारी व स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडे अंत्यसंस्काराची जबाबदारी असून ते सध्या भितीच्या छायेत काम करीत आहेत. कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका स्वतंत्र जागेची मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. 

"सदाशिवनगरमध्ये अंत्यसंस्कार वाढले आहेत. रोज पाच सफाई कामगारांची मदत या कामासाठी घेतली जाते. आठवडाभरानंतर त्यांना या कामातून मुक्त केले जाते. त्यांची आरोग्य तपासणीही केली जाते. त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये याची खबरदारी घेतली जाते."

- डॉ. बसवराज धबाडी, आरोग्याधिकारी

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: destroying of dead bodies on open space in belgaum and effectiveness in administration