कोरोना लसीकरणासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 March 2021

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. यावेळी 1.0 सॉफ्टवेअर मदत घेऊन लसीकरणाला सुरवात केली होती

बेळगाव - कोरोना लसीकरणासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. कोविन 2.0 असे सॉप्टवेअरचे नाव असून, 1 मार्चपासून या सॉफ्टवेअरच्या आधारे लस देण्यास सुरु झाले आहे. 1,650 जणांना डोस देण्याचे उद्दिष्ठ होते. पैकी 1,054 जणांना लस दिली आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून 582 जणांनी लस घेतल्याची नोंद आहे. 112 कोरोना योध्दा, 45 ते 60 वयोगटामधील 127, 60 पेक्षा अधिक वय झालेल्या 503 जणांना 1 ते 5 मार्च या कालावधीमध्ये लस देण्यात आली आहे. 

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. यावेळी 1.0 सॉफ्टवेअर मदत घेऊन लसीकरणाला सुरवात केली होती. पण, या सॉफ्टवेअरात उणिवा होत्या. त्याला पर्याय म्हणून कोविन-2.0 सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. 1 मार्चपासून नवीन प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून, 1 ते 5 मार्च या कालावधीसाठी 1,650 जणांना लस देण्यासाठी उद्दिष्ठ होते. पैकी 1,054 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि सहाय्यक मिळून पहिल्या फेरीत 38 जणांनी लस घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 274 जणांना लस देण्यात आली आहे. कोरोना योध्दांसाठीही लसीकरण सुरु झाले आहे. यात महसूल अधिकारी, पोलिस, पंचायत राज अधिकारी, राजकीय नेत्यांचा समावेश आहे. यानुसार पहिल्या फेरीमध्ये 112 जणांनी लस घेतली आहे. दुसरी फेरी अजून सुरु व्हायची आहे. 1 मार्चला 45 ते 60 वयोगटासाठी पहिल्या फेरीसाठी लसीकरण सुरु झाले असून, 127 जणांनी डोस घेतले आहे. 60 पेक्षा अधिक वय झालेल्यांनाही लस देण्यास सुरु झाले असून, 503 जणांनी लस घेतली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून नवीन सॉफ्टवेअर बसविण्याचे काम सुरु होते. आता प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या सोमवारपासून (ता.8) लसीकरणाला पूर्ण क्षमतेने सुरवात होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये इच्छूकांनी स्वतः आपले नाव नोंदविता येणार आहे, केंद्रात येऊनही नोंदणी केली जाऊ शकते, ग्रामीण भागामधील जनतेला संगणक ज्ञान किंवा प्रक्रियेची माहिती मिळत नाही. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्ते किंवा हेल्थ वर्करची मदत घेऊन लसीकरणासाठी नाव नोंदविता येऊ शकते. 16 केंद्रात सध्या लसीकरण सुरु आहे. त्यांची संख्या 40 पर्यंत वाढविणार असल्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
जुन्या सॉफ्टवेअरद्वारे 63 टक्के लसीकरण 
जिल्ह्यात 16 जानेवारीला लसीकरण सुरु झाले. त्यावेळी 1.0 सॉफ्टवेअरची मदत घेतली जात होती. डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचारी मिळून 46,682 जणांना पहिल्या फेरीमध्ये लस देण्याचे उद्दिष्ठ होते. 29,704 जणांनी लस घेतली असून, 63.6 टक्के उद्दिष्ठ गाठले आहे. 
 

  संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Developed new software for corona vaccination