विकासाचे मुद्दे प्रचारात अजूनही दुर्लक्षितच

विकासाचे मुद्दे प्रचारात अजूनही दुर्लक्षितच

सातारा - सातारा पालिकेच्या निवडणुकीत रंग भरायला लागले असले तरी सध्याचे प्रचारातील मुद्दे घराणं आणि न्याय-अन्यायाची भूमिका... अशा मुद्द्यांभोवतीच फिरते आहे. त्यापलीकडे येथील प्रचार जायला मागत नाही. अर्थात प्रचाराचा हा पहिला टप्पा असला तरी अजून कोणीच विकासाच्या मुद्यांना हात घातलेला दिसत नाही. सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या सुविधांशी थेट निगडित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक शहराच्या विकासाच्या मुद्यांवर लढली गेली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. विकासाचे हे मुद्दे कोणते असावेत, याविषयी ‘सकाळ’ने घेतलेला जनमताचा कानोसा...

अर्धवट पाणीपुरवठा योजना 
शहराच्या काही भागांत अद्याप सुमारे दहा हजार लोकवस्तीस पुरेसे पाणी नाही. आराखड्याबाहेर जाऊन आणखी तीन टाक्‍या बांधाव्या लागत आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजना सात वर्षे होऊनही अपुरी राहिली. सर्वांना पाणी मिळायला आणखी किती वर्षे लागणार, असा नागरिकांचा सवाल आहे. कास क्षमता वाढीच्या प्रकल्पाचे रेंगाळलेले काम हाही जनतेच्या चिंतेचा विषय आहे.

गरिबांना घरकुले कधी?
सरकारी जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या कुटुंबांसाठी ‘आयएचएसडीपी’ योजना आहे. शहरात सहांपैकी तीन ठिकाणच्या संकुलात लाभार्थी राहायला गेले. परंतु, अद्याप ७२० घरकुलांचे बांधकाम व्हायचे आहे. ‘सरकारी काम दहा वर्षे थांब’ या म्हणीचा फटका याही योजनेला लागू पडतो. 

सार्वजनिक स्वच्छता 
साताऱ्यातील ४० वॉर्डमध्ये घंटागाड्या धावतात. वर्षाला काही लाख रुपये त्यावर खर्च होतो. तरीही रस्त्यांवर कचराकुंड्या वाहताना दिसतात. पोवई नाका, सदरबझार, तसेच शहरातील बाजारपेठांमध्ये सार्वजनिक मुताऱ्यांची गरज आहे. ज्या आहेत; त्या प्रचंड अस्वच्छ आहेत. हे चित्र बदलणार कधी, कचराकुंडीमुक्त शहर कधी होणार, असा सर्वसामान्यांचा प्रश्‍न आहे. 

सार्वजनिक वाहतूक
सिटीबस १५ वर्षांपूर्वीच इतिहासजमा झाली आहे. मनमानी रिक्षा वाहतूक सर्वसामान्यांना परवडणारी नाही. प्रत्येकाला खासगी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पार्किंग, वाहतूक कोंडी यासारखे प्रश्‍न शहरात आ वासून उभे आहेत. सिग्नल यंत्रणाही मोडीत निघाली आहे. 

रस्त्याचे रेंगाळलेले काम
सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दोन वर्षांत अवघ्या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करता आले नाही. शिवराज पेट्रोल पंपाजवळ पुलाचे काम रेंगाळल्याने सुमारे वर्षभर पोवई नाका ते शिवराज हा रस्ता बंद होता. आजही बायपासचे काम अपूर्ण आहे. शहरातील प्रमुख रस्ता वर्षभर बंद राहतो. प्रशासनापासून कोणालाच याचे काहीही वाटत नाही, ही साताऱ्याची शोकांतिका आहे. 

...या मुद्यांवर प्रचारात व्हायला हवी चर्चा ! 
 साताऱ्याचा पाणीप्रश्‍न कधी सुटणार
 नासाडी टाळण्यासाठी मीटरने पाणी कधी
 कचरामुक्त शहरासाठी अजेंडा काय
 साताऱ्याच्या हद्दवाढीबाबत भूमिका
 नोकरीसाठी पुण्याला पळणारे लोंढे कधी थांबणार
 एमआयडीसीत उद्योगवाढीसाठी काय प्रयत्न करणार
 सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी काय करणार
 वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थेचे उत्तर काय असणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com