मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

"मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...अहो हे ठीक आहे; पण इतक्‍या सकाळी सकाळी याल असं वाटलं नव्हतं' सकाळी हा संदेश सर्वच सोशल मीडियावर फिरत होता. तर अर्धवट तुटलेल्या बाणाचे चित्रही सर्वत्र चर्चेचा विषय ठरले.

कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आज सोशल मीडियावर दिवसभर या धक्कातंत्राचीच चर्चा रंगली होती. "मी पुन्हा येईन' या फडणवीस यांच्या वाक्‍याने सोशल मीडियावर विविध कोट्या केल्या जात होत्या. नेटकऱ्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनाही सोडले नाही. विनोदी टिप्पणी करून नेटकऱ्यांनी राजकीय भाष्य केले. 

"मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...अहो हे ठीक आहे; पण इतक्‍या सकाळी सकाळी याल असं वाटलं नव्हतं' सकाळी हा संदेश सर्वच सोशल मीडियावर फिरत होता. तर अर्धवट तुटलेल्या बाणाचे चित्रही सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. या सर्व घडामोडींच्या मागे शरद पवार तर नाहीत ना? हे स्पष्ट होत नव्हते. म्हणून मग काही जणांनी "घडी, पहेले इस्तमाल करो फिर विश्‍वास करो' या जाहिरातीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. व्यंगचित्रे, म्हणी, गाणी या सगळ्यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावरही पोलिटीकल फिव्हर पहायला मिळाला. दुपारी राष्ट्रवादीचे आमदार परत आले. त्यांना पाहून तर अनेकांनी "वारं फिरलं, काकांनी तारलं' अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. विडंबनात्मक काव्येही सोशल मीडियावर होती.

संध्याकाळी "आधी बहुमत सिद्ध करा, मगच पेढ्यांची ऑर्डर स्वीकारली जाईल' अशी पुणेरी पाटी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. काही वैतागलेल्या नेटकऱ्यांनी "निवडणूक ओळखपत्र विकणे आहे' अशी पोस्टही टाकली. एकंदरीतच दिवसभर सोशल मीडियावर राजकीय चर्चा आणि विनोदांना उधाण आले होते. 

घटनेतील पेचप्रसंग... 

दिवसभर ज्या घडामोडी घडत होत्या, त्यातून राज्यात घटनात्मक पेचप्रसंग झाल्याचे लक्षात येत होते. मात्र, काही वकिलांनी आणि घटना अभ्यासकांनी याबाबतची माहिती देणारे विस्तृत लेखही सोशल मीडियावर शेअर केले होते. तर काहींनी राजकीय विश्‍लेषणे लिहिली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis, Ajit Pawar Criticism On Social Media