देवगड, रत्नागिरी हापूस आंबा सांगलीत दाखल

विष्णू मोहिते
Sunday, 28 February 2021

सांगलीतील विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला मार्केटमध्ये देवगड व रत्नागिरी हापूस आब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

सांगली : सांगलीतील विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला मार्केटमध्ये देवगड व रत्नागिरी हापूस आब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

मार्च अखेर एप्रिलपासून सुरू होणारा हंगाम यंदा दीड ते दोन महिना लवकर सुरू झालेला आहे. दरातील तेजीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून लवकर आंबा बाजारात आणला आहे. कोरोनामुळे सध्या उठाव कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात आज 1000 हजार पेटी आंबा दाखल झाला आहे. देवगड हाफुस एक डझनाचा दर किमान 500, कमाल 1600 रुपये सरासरी एक हजार रुपये तर रत्नागिरी हापुस चार ते पाच डझन पेटीचा दर किमान 3000, कमाल 5000 रुपये सरासरी दर चार हजार रुपये आहे. 

जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम सध्या जोमात सुरू झाला असताना फळांचा राजा असलेला आंबा सांगलीच्या बाजारात दाखल झाला आहे. देवगड येथील हापूस आंबा आणि रत्नागिरी येथील हापुल आंबा विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला बाजारात दाखल झाला आहे.

सरासरी प्रत्येक व्यापाऱ्यांकडे 50 ते 100 पेटी माल विक्रीसाठी आहे. फळांचा राजा आंबा साधारणपणे मार्च अखेर, एप्रिल महिन्यात येण्यास सुरवात होते. यंदा फेब्रुवारीतच आंबा दाखल झाला आहे. 

ग्राहकांतून हवा तसा प्रतिसाद नाही

बाजारात आंबा दाखल झाला असला तरी कोरोनामुळे ग्राहकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक व्यापाऱ्यांकडे सध्या पन्नास ते शंभर पेटींचा उठाव होतो आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल.

- मुसा आबालाल बागवान, फळे व भाजीपाला व्यापारी, सांगली 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devgad, Ratnagiri Hapus Mango filed in Sangli