यल्लम्मा डोंगरावर आला भाविकांचा पूर...

Devotees rush to Yallamma hill area of ​​Saundati for Shakambari Purnima Yatra belgum marathi news
Devotees rush to Yallamma hill area of ​​Saundati for Shakambari Purnima Yatra belgum marathi news

बेळगाव - शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त सौंदत्तीतील यल्लम्मा डोंगर परिसर भाविकांनी फुलला. प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडीमुळे रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना सौंदत्ती गावापासूनच यात्रेच्या ठिकाणापर्यंत चालत जावे लागले. हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र, भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ‘उदे गं आई... उदे..... उदे....!’ च्या जयघोषात व भंडाऱ्याची उधळण करीत भाविक डोंगरावर दाखल होत आहेत.

गर्दी अन्‌ वाहतूक कोंडीमुळे डोंगरावर चालत जाण्याची वेळ

शाकंभरी पौर्णिमेला होणाऱ्या रेणुका देवी यात्रेला बेळगावसह उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील भाविक गर्दी करतात. यंदा ६ जानेवारीपासून यात्रेला सुरवात झाली असून, ती १६ पर्यंत चालणार आहे. ९, १०, १२, १४ हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत. बेळगावातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. काल (ता. ९) व आज मुख्य दिवस असल्याने बेळगावातील भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती. यासह गदग, हावेरी, बागलकोट, विजापूरमधूनही भाविक दाखल झाले. त्यामुळे, आज सकाळपासूनच डोंगरावर गर्दी होती. 
डोंगरापासून सौंदत्ती गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी वाहने सौंदत्तीतच अडविली. यामुळे भाविकांची अडचण झाली. यात्रेच्या निमित्ताने डोंगरावर वास्तव्यासाठी जाणाऱ्या भाविकांना आपले साहित्य सोबत घेऊन पायीच सुमारे पाच किलोमीटरचे अंतर कापावे लागले. 

देवीच्या दर्शनासाठी रात्रंदिवस रांगा लागल्या असून तीन ते चार तास रांगेत थांबल्यानंतर दर्शन मिळत आहे. मंदिर परिसरासह डोंगरावर जिथे तिथे भंडाऱ्याची उधळण केली जात असून डोंगर सोन्याहून पिवळा दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी सामुहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम होत आहे. जोगणभाव परिसरात स्नानासाठी गर्दी होत आहे. जोगण भावच्या ठिकाणीच देवीचे मोती बांधण्याचा कार्यक्रमही होत असल्याने देवदासी प्रथेला आळा घालण्यासाठी पोलीस व महिला बाल कल्याण खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

पुरेसे पाणी तरीही टंचाई

यंदा पाऊस अधिक झाल्याने नदी-नाल्यांत पाणी आहे. पण, डोंगरावर पाणी विकत घेण्याची वेळ भाविकांवर आली. डोंगरावर प्रतिघागर ५० रुपयांप्रमाणे स्थानिक लोक पाण्याची विक्री करीत आहेत. मंदिर परिसरात व पायथ्याशी पाणी असले तरी डोंगरमाथ्यावर पाण्याची सुविधा नाही. मंदिर प्रशासनाकडून पाच ट्रॅक्‍टरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्याची वेळ निर्धारित नसल्याने भाविक पैसे खर्चून पाणी विकत घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com