पंढरपुरात धनगर समाजाचा मेळावा; शरद पवार, प्रियांका गांधी यांची उपस्थिती 

रजनीश जोशी
शुक्रवार, 26 जुलै 2019

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपुरात धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे.

पंढरपूर ः धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपुरात धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते आमदार रामहरी रुपनवर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

स्वातंत्र्यानंतरही धनगर समाज अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावी, ही मागणी केल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधारी भाजप शिवसेनेने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, उलट सत्तेसाठी वापर करुन समाजाची फसवणूक केली आहे. 

धनगर समाजाचा आक्रोश दाखवण्यासाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी येथील रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय भव्य आरक्षण मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख धनगर समाज बांधव उपस्थित राहतील. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रीत केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी शालीवाहन कोळेकर, माऊली हळणवर, सुभाष मस्के आदी उपस्थित होते. 

सर्व संघटनांचा एकत्रित लढा 
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समन्वय समितीच्या वतीने पंढरपुरात येत्या 9 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता, धनगर समाजाचे अनेक नेते वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने करत आहेत. सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार आहे. 9 ऑगस्ट रोजी होणार्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे, तर तेही 11 ऑगस्ट रोजीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, असे आमदार रुपनवर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community rally in Pandharpur Presence of Sharad Pawar And Priyanka Gandhi