गड आला पण सिंह गेला:  ढवळीच्या उपसरपंचाच्या  विजयाने संपूर्ण गावाच्या डोळ्यात आले पाणी

रवींद्र माने
Tuesday, 19 January 2021

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही काही जागांसाठी निवडणूक लागली.

तासगाव (सांगली): गड आला पण सिंह गेला अशी काहीशी अवस्था ढवळीकर ग्रामस्थाची निवडणूक निकालानंतर झाली. निवडणुकीत उभे असलेले ढवळीचे उपसरपंच कै. अतुल विष्णू पाटील यांचा झालेला विजय चटका लावणारा आणि मन हेलावून टाकणारा असा ठरला. 

ढवळीचे उपसरपंच अतुल विष्णू पाटील यांचा निवडणूक मतदान झाल्यानंतर 16 जानेवारी रोजी क्रिकेट खेळताना मैदानातच निधन झाले. ते स्वतः आताच्या निवडणुकीत उमेदवार होते. गावातील मतभेद संपून विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावपातळीवर सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही काही जागांसाठी निवडणूक लागली.

हेही वाचा धक्कादायक : संपूर्ण कुटुंबानेच संपविले जीवन

निवडणुकीचा निकाल ही लागला त्यामध्ये 333 मते घेऊन अतुल पाटील विजयी झाले. मात्र दुर्देवाने आपला विजय पहायला ते या जगात नसल्याने संपूर्ण गाव हळहळले. त्यांचे पॅनल आले पण त्यासाठी धडपडणारे अतुल पाटील मात्र नसल्याने त्यांच्या सहकाऱ्यांची अवस्था गड आला पण सिह गेला अशी झाली. मतमोजणी नंतर समाज माध्यमातून त्यांची मागील निवडणुकीचे फोटो व्हिडिओ शेअर करून त्यांच्या मित्रांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.अतुल पाटील हे खासदार संजयकाका पाटील यांचे खंदे समर्थक होते. केमिस्ट असोसिएशनचे ते संचालक होते. तासगाव आणि ढवळी येथे त्यांची दोन औषध दुकाने आहेत. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhavali subarpancha atul patil candidate list