तासगाव तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतीसाठी धुमशान 

रवींद्र माने 
Saturday, 19 December 2020

तासगाव तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतीसाठी धुमशान सुरू झाले असून राजकीय हालचाली कमालीच्या गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप शिवसेना कॉंग्रेस शेकाप आपापल्या बळावर लढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

तासगाव : तासगाव तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतीसाठी धुमशान सुरू झाले असून राजकीय हालचाली कमालीच्या गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप शिवसेना कॉंग्रेस शेकाप आपापल्या बळावर लढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक गावपातळ्यांवर युत्या-आघाड्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. 

तालुक्‍यातील 68 ग्रामपंचायत्यापैकी 39 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. गाव पातळीवरच्या या निवडणुका त्या त्या गावात प्रतिष्ठेच्या असतात.राजकारणात चमकण्याची संधी मिळत असल्याने त्यामुळे अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. शिवाय तासगाव तालुक्‍यातील दोन पारंपरिक गटामुळे त्याला एक राजकीय धार ही चढते. अपवाद वगळता यावेळीही बहुतांश सर्व गावामध्ये हे दोन्ही गटातच ही निवडणूक लागली आहे. पक्षीय पातळीवर निवडणूक होण्याची शक्‍यता नसल्याने स्थानिक गटातटात तडजोडी सुरु झाल्याचे पहिल्या टप्प्यात दिसू लागले आहे. 

राजकीय पक्षांकडून ज्या गावात ताकद कमी तिथे तडजोड आणि ताकद जास्त तिथे स्वबळ ! असा "जाळ" घातला जात आहे. जोडीला वाडा, भावकी, जात आहेच ! सगळ्यात मोठी गोची आहे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसची !अनेक गावामध्ये दोन दोन गट आहेत गेल्या वेळी या गटबाजीतच काही ग्रामपंचायती हातच्या गेल्या आहेत त्याचे उत्तम उदाहरण सावळजचे देता येईल. त्यामुळे आमदार सुमनताई पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय येळावी कवठेएकंद यासारख्या मोठ्या गावात स्थानिक पातळीवर अन्य पक्षांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. एकूणच निवडणूक सद्या पहिल्या टप्प्यात तडजोडी बोलणी चर्चा अशा पातळीवर पोहोचली आहे. 

चर्चांना ऊत... 
आबा आणि काका गटाची प्रत्येक गावात स्वतःची अशी ताकद आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेची ताकद किती ? हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय पक्षीय पातळीवर झालेला एखादा निर्णय गाव पातळीवर मानला जाईल हे अशक्‍य असल्याने "महाआघाडी" चे काय ? याबाबत सद्या केवळ चर्चा सुरू आहेत.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhumshan for 39 gram panchayats in Tasgaon taluka