सोंगटी... अजून जिवंत आहे..! 

dice gaming is still going on
dice gaming is still going on

महाभारतात या खेळाला द्युत म्हणायचे. महाराष्ट्रात तो आता सोंगट्या या नावाने ओळखला जातो, तर कर्नाटकात त्याला पगडी असे म्हणतात. पांडवांनी द्युतात द्रोपदीला पणास लावले आणि त्यानंतर जे महाभारत घडले ते सर्वज्ञात आहे. कवड्या हातात घोळवून त्या पटावर फेकतानाचा तो शकुनीमामाचा छोट्या पडद्यावर पाहिलेला चेहरा आणि ते राक्षसी हास्य आजही अनेकांना आठवत असेल. तो खेळ काळाच्या ओघात संपला की काय, असे वाटत होते. पण, काही गावांनी जाणीवपूर्वक त्याची जपणूक केली आहे. त्यात नांद्रेसारखे गाव आघाडीवर आहे. त्यासोबत कसबे डिग्रज, बेडग, मिरज, कवठेपिरान, दुधगाव, म्हैसाळ, समडोळी, कुमठे यांसह शेजारील दानोळी, कवठेसार आदी गावांमध्ये सोंगट्या मंडळे प्रसिद्ध आहेत. एका नांद्रेत एक डझन सोंगट्या मंडळे असून दरवर्षी महाराष्ट्रव्यापी स्पर्धा या गावात भरते. 

असा चालतो खेळ 
या खेळात सोळा सोंगट्या असतात. एका संघाकडे आठ, तर दुसऱ्या संघाकडे आठ सोंगट्या. एका संघातील खेळाडूंची संख्या असते सहा. कसोटी खेळ तोडीचा असायचा आणि तो 10 ते 12 तास चालायचा. आता वन-डे स्वरुपातील खेळ असून तो 20 मिनिट ते दोन तासांपर्यंत चालतो. कसोटीचा खेळ 83 घरांचा होता, वन-डे 75 घरांपर्यंत चालतो. हा तीन माडीचा डाव असतो. त्यात कवड्या सरळ आणि उलट्या जशा पडतील त्यानुसार 10, 25, 12, 2, 3, 4, 6 असे दान असतात. कर्नाटकमध्ये सोंगड्या हाताने फेकल्या जातात, महाराष्ट्रात मोठ्या वाटीत त्या घोळवून टाकण्याची पद्धत आहे. या खेळाला एकूण पन्नासहून अधिक नियम आहेत. या खेळातील डावांवरून "तो माझ्या पटावर येऊच दे, मग मी बघतो', "मी कट्टी लावली की सोडत नाही', अशा म्हणी प्रचलित झाल्या आहेत. 15 हजारांपासून एक लाखापर्यंतचे विजेतेपदाचे बक्षीस असणाऱ्या स्पर्धा रंगतात. या खेळाच्या संघटनाही स्थापन झाल्या आहेत. 

खेळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न

सोंगटीच्या खेळाला जिवंत ठेवण्याचा आणि तो सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने या खेळाला मान्यता द्यावी, यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र महाभारतातील संदर्भांमुळे त्यात यश आलेले नाही. शासनाने याचा सकारात्मक विचार करून मान्यता द्यावी. 
- सूरज मुल्ला, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र सोंगटी असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com