डिक्‍शनरी दिवस : डिजिटल युगातही कोश महात्म्य कायम 

विजय बक्षी
Friday, 16 October 2020

आज 16 ऑक्‍टोबर. अमेरिकन डिक्‍शनरीचे जनक नोह वेबस्टर यांचा हा जन्मदिवस. हा दिवसच शब्द भांडाराचा, शब्दकोशाचा म्हणजेच डिक्‍शनरी दिवस म्हणून साजरा होत. यानिमित्ताने... 

गुगलच्या आजच्या जमान्यात नित्य वापरात शब्दकोशाचा वापर कमी झाला तरी भाषा अभ्यासासाठी आजही शब्दकोशांचे महत्व कायम आहे. आज 16 ऑक्‍टोबर. अमेरिकन डिक्‍शनरीचे जनक नोह वेबस्टर यांचा हा जन्मदिवस. हा दिवसच शब्द भांडाराचा, शब्दकोशाचा म्हणजेच डिक्‍शनरी दिवस म्हणून साजरा होतो. निमित्ताने... 

एखाद्या भाषेतील शब्द,आकार विल्हे लिहून त्यांचे अर्थ व्युत्पत्ती आणि त्यांचा उपयोगाची माहिती देणाऱ्या ग्रंथाला शब्दकोश म्हणतात. इंग्रजीत डिक्‍शनरीचा उगम इ.स. 1225 ला सुरु झाला. पंधराव्या शतकात इंग्रजी भाषेतल्या शब्दांचे शब्दकोश निघू लागले. अशाच एका शब्दसंग्रहात 12 हजार इंग्रजी शब्द त्याला अनुरुप अशा लॅटिन शब्दाला दिले होते. पहिला इंग्रजी शब्दकोश 1552 मध्ये छापण्यात आला. या संग्रहात इंग्लिश या शब्दाची व्याख्या प्रथम इंग्रजीत करण्यात आली. 

मराठीत कोश वाङ्मयाची सुरवात 1890 साली झाली. डॉ. मराठीत शब्दकोशाची असलेली विविधता हे आपल्या पूर्वसुरींच्या भाषेसेवेच अमुल्य से संचित आहे. 1875 मध्ये पाककलेवर "सूपशास्त्र' प्रकाशित झाले. त्यानंतर मराठीतील पहिला चरित्रकोश "भारत वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश' 1876 मध्ये प्रकाशित झाला. त्याचे कर्ते होते रघुनाथ भास्कर गोडबोले. 707 पानांच्या कोशातून पौराणिक व्यक्तिचरित्रावरील त्यात माहिती मिळते. 1881 मध्ये श्री गोडबोले यांचा "भारत खंडाचा अर्वाचिन कोश' प्रसिध्द झाला. त्यांचे विवेक सिंधू (1885), ज्ञानदेव गाथा (1877) असे माहिती कोश प्रसिध्द झाले. त्यापुर्वी हंस कोश (1863), मराठी भाषेचा नविन कोश (1870), असे माहिती कोश प्रसिध्द झाले. 

तत्पुर्वी शिवछत्रपतींनी राजभाषा व्यवहार कोश प्रसिध्द केला. पारशी, अरबी भाषेतील अनेक शब्दांचा मराठीत परिचय करुन देण्यामागे त्यांचा हेतू प्रशासकीय होता. मराठी भाषेच्या समृध्दीसाठीचे ते पाऊल होते. ब्रिटीशांचा गॅझेटियर प्रसिध्द करण्यामागेही तोच हेतू होता. आजही ही गॅझेटियर तत्कालीन जिल्हे,प्रांतांचे माहिती कोश आहेत. मराठीत निव्वळ शब्दकोशाचे 400 प्रकार आहेत. स्वातंत्र्यपुर्व काळात 134 तर स्वातंत्र्यानंतर 2100 पेक्षा अधिक कोश प्रसिध्द झाले आहेत. 

श्रीधर व्यकंटेश केतकर यांची ज्ञानकोश निर्मिती आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली वीस खंडातील विश्‍वकोश निर्मिती मराठी भाषेचे वैभव आहे. महादेवशास्त्री जोशी यांनी 1962 ते 1971 या कालखंडात भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी या सर्व उपक्रमागे शासन बळ उभे करीत मराठी भाषेच्या समृध्दीसाठी प्रयत्न केले. 
डिजिटलच्या जमान्यात आता शब्दकोशांचे स्वरुप बदलले आहे.

ऑनलाईन शब्दकोशांची सुरवात 12 डिसेंबर 2002 ला झाली. त्यांना विक्‍शनरी म्हटले जाते. 28 मार्च 2004 रोजी फ्रेंच व पोलिश भाषेतील विक्‍शनरीचा प्रारंभ झाला. आता विविध 158 भाषांमधील विक्‍शनरी असून त्यामध्ये 29 लाखांहून अधिक शब्द आहेत. मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू अशा सर्व भारतीय भाषांचाही त्यात समावेश आहे. काळ कोणताही असो कोशाचे महत्व कायम राहणार आहे. भाषेचे अस्तित्व कायम ठेवणारे, शब्द भांडार अभ्यासकांसाठी खुले करणाऱ्या या कोशांचे महत्व त्यामुळे डिजिटलच्या जमान्यातही कायम राहील. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dictionaries Day: Inportance of Dictionaries remains in the digital age