कामवाली नाही आली मग काय घासा आता, दुसरा पर्याय आहे तरी काय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

शहरात नवीन इमारतींची अनेक कामे राजरोसपणे सुरू आहेत. या कामांवर पाचपेक्षा अधिक कामगार असतात. या कामगारांच्या आरोग्याबाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

नगर ः कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ओळखपत्राविना कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. घरकाम करणाऱ्या महिलांना आज घरातच बसून राहावे लागले. त्यामुळे शासकीय व वैद्यकीय सेवेतील महिला कामगारांना घरातील कामे करूनच कामावर जावे लागले. धनिक मंडळींची तर चांगलीच अडचण झाली. आता तर संचारबंदी केल्याने त्यात आणखीच भर पडली आहे. 

किराणा, मेडिकल, भाजीबाजार उघडला 
शहरातील किराणा दुकाने, मेडिकल व भाजीबाजार आज उघडला. नागरिकांनी सकाळीच आवश्‍यक वस्तूंची खरेदी करून घेतल्याने भाजीबाजार व किराणा दुकानांत गर्दी होती. 

पेट्रोल पंपांवर गर्दी 
शहरात प्रतिबंधात्मक आदेश 31 मार्चपर्यंत लागू झाले. हे आदेश पुढेही वाढविले जाऊ शकतात अशी अफवा पसरल्याने नागरिकांनी आपल्या वाहनांत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. यात दूध व वैद्यकीय सेवेतील वाहनांची संख्या अधिक होती. 

एमआयडीसीत कंपन्या सुरू 
शहरासह जिल्ह्यातील एमआयडीसीमधील कंपन्या सुरू आहेत. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुटी दिलेली नाही. तसेच काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामाच्या नियोजनासंदर्भात एकत्र बैठक घेऊन सूचनाही दिल्या जात आहेत. 

बांधकामे सुरूच 
शहरात नवीन इमारतींची अनेक कामे राजरोसपणे सुरू आहेत. या कामांवर पाचपेक्षा अधिक कामगार असतात. या कामगारांच्या आरोग्याबाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्याबरोबरच काही जुन्या घरांच्या डागडुजीचीही कामे सुरू आहेत. या ठिकाणीही पाचपेक्षा अधिक लोक काम करीत आहेत. 

माव्याची खुलेआम विक्री 
शहरातील मावा विक्री केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच विक्री हातोहात केली जात आहे. कलम 144 लागू असतानाही काही टपरीचालक घरी मावा तयार करून रस्त्यावर टेबल खुर्ची मांडून विक्री करत आहेत. ही विक्री सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सुरू राहते. 

ऑनलाइनचा बाजार सुरूच 
ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री जोमात सुरू आहे. शहरातील दुकाने बंद असताना ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन वस्तूंमार्फतच घराघरांत कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

किराणा माल घरपोच 
किराणा मालाची दुकाने आज उघडली; मात्र काही दुकानदारांनी ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी किराणा माल घरपोच करण्याची सेवा दिली. 

बॅंकांमध्ये वृद्धांनाच प्रवेश 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर सावेडीतील स्टेट बॅंकेत एका वेळी केवळ दोनच वृद्धांना प्रवेश देण्यात येत होता. तरुणांना बॅंकेबाहेरील एटीएम व ऑनलाइन बॅंकिंग करण्यास सांगण्यात आले. इतर बॅंकांत एका वेळी दोन जणांनाच बॅंकेत प्रवेश देण्यात येत होता. या दोन्ही व्यक्‍ती दोन स्वतंत्र काउंटरवर जाऊन व्यवहार करू शकत होते. 

कापडबाजार बंद; डाळमंडई सुरू 
प्रतिबंधात्मक आदेशामुळे आज कापडबाजार, मोची गल्ली, नवी पेठ, सराफ बाजार आदी मुख्य बाजारपेठा बंद होत्या. मात्र, जीवनावश्‍यक वस्तूंमुळे डाळमंडई सुरू होती. डाळमंडईतील प्लॅस्टिक व इतर वस्तूंची दुकाने बंद होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulty caused by communication block