तुम्ही डिजिटल साक्षर आहात; पुढील जनगननेत असेल रकाना?

अजित झळके
Tuesday, 8 September 2020

भविष्यात साक्षरतेची टक्केवारी काढताना "डिजीटल साक्षर किती?' या स्वतंत्र रकाना आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 
 

सांगली ः जगातील साक्षरतेची परिभाषा पूर्णपणे बदलून गेली आहे. सही करता येणारा साक्षर, हे सूत्र कधीच मागे पडले आहे. आता युग डिजीटल साक्षरतेचे आहे. "काला अक्षर भैंस बराबर' अशी स्थिती असणाऱ्या निरक्षण लोकांची संख्या अर्थातच झपाट्याने कमी होत असताना भविष्यात डिजीटल साक्षरता हे मोठे आव्हान स्विकारण्याची वेळ आली आहे. 

जिल्ह्यात सरकारी आणि खासगी सुमारे 60 टक्के शाळा डिजीटल झाल्या असून मोबाईलचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 80 टक्‍क्‍यांवर पोहचली आहे. अर्थात, डिजीटल साक्षरतेत इंटरनेटच्या सुरक्षित वापरापासून ते ऑनलाईन बॅंकिंग प्रणालीपर्यंत सारे जग विस्तृत आहे. साक्षरता दिनाच्या निमित्ताने केवळ जिल्ह्यातील "एसटीचा फलक वाचता येणाऱ्या' साक्षरांवर चर्चा करून चालणार नाही. आता गरज आहे ती मोबाईल, इंटरनेट साक्षरता वाढवण्यासाठी. त्यासाठी स्वतंत्र मोहिम राबवण्याची. जगाची गरज आणि केंद्र सरकारचे धोरण पाहता पुढच्या जनगननेत "डिजीटल साक्षर' असा रकाना आला तर आश्‍चर्य वाटायला नको. 

सन 2011 साली झालेल्या जनगननेनुसार, जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के आहे. शहरी भागात 86 टक्के तर ग्रामीण भागात 80 टक्के लोक साक्षर आहेत. पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण सरासरी 88.5 टक्के असून शहरात 90 तर ग्रामीण भागात 87 टक्के पुरुष साक्षर आहेत. महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. ते शहरात 82 टक्के आणि ग्रामीण भागात 72 टक्के आहे. अर्थात, नवी पिढी आली. शिक्षण हक्काचा कायदा आहे. प्रत्येकाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे केले गेले. शाळाबाह्य मुलांना शाळेपर्यंत आणले गेले. सहाजिकच, नव्या पिढीत साक्षरतेचे प्रमाण हे जवळपास शंभर टक्के आहे. 
आता मोबाईलचा वापर आणि साक्षरता असा नवा सर्व्हे करण्याचे दिवस आहेत. जग आणि भारतात मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन बॅंकिंग झपाट्याने वाढत आहे. अशावेळी मोबाईलचा वापर कसा करायचा, सुरक्षिततेची खबरदारी काय घ्यायची, याविषयी जगजागृतीची मोहिमच राबवावी लागत आहे. मोबाईल वापराविषयीचे वर्गही भरवले जात आहेत. त्यामुळे भविष्यात साक्षरतेची टक्केवारी काढताना "डिजीटल साक्षर किती?' या स्वतंत्र रकाना आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

भारतातील मोबाईल वापर 

  • सन 2016 साली 28 कोटी 16 लाख लोक मोबाईल वापरत होते. 
  • सन 2017 साली 35 कोटी 51 लाख लोकांकडे मोबाईल आला. 
  • सन 2018 साली 39 कोटी 9 लाख लोक मोबाईलवर आले. 
  • सन 2019 साली 42 कोटी 7 लाख लोक मोबाईलचे वापरकर्ते झाले. 
  • यंदा ते प्रमाण 45 कोटीहून अधिक होईल, असा साधारण अंदाज आहे. 

ऑनलाईन बॅंकिंग 

एका सर्व्हेनुसार भारतातील सुमारे 4 कोटी 50 लाख लोक ऑनलाईन बॅंकिंग करतात. यावर्षी ते प्रमाण 15 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याला बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे. फोन पे, गुगल पे यांसारख्या स्मार्ट फोनशी थेट कनेक्‍ट असलेल्या ऑनलाईन बॅंकिंग प्रणालीचा वापर झपाट्याने वाढला असून जिल्ह्यातील प्रत्येक दुकान "ऑनलाईन बॅंकिंग कोडिंग'ने जोडण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरु आहे. 

देशात इंटरनेटचा वापर जगाच्या सरासरीएवढा

जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची सरासरी टक्केवारी 53.6 टक्के इतकी आहे. भारतात जगाच्या सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 54.29 टक्के इतके लोक इंटरनेटचा वापर करतात. त्याबाबत साक्षरता आणि सुरक्षिततेबाबतच्या साक्षरतेचे प्रमाण चिंताजनक आहे. तुलनेत मोठ्या देशांत कुवैतमध्ये 98 टक्के, दक्षिण कोरियात 96 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Digital literate" will be in the next census?