अंधशाळेत उजळते डोळस दिवाळी....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

त्यांना जरी आकाशकंदील, पणत्या, फटाके लावून दिवाळी साजरी करता आली नाही तरी ते ब्रेल लिपीतील दिवाळी अंक वाचून त्यांची दिवाळी साजरी करतात. अंधशाळेत ४ ब्रेल लिपीतील दिवाळी अंक येतात.

कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, अंधाराच्या कुशीत जन्मलेली मुले हा सण कसा साजरा करतात. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःबरोबर इतरांचे जीवनही प्रकाशमय करून ते आपली दिवाळी साजरी करतात. येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुले दिवाळीपूर्वीच आपली दिवाळी साजरी करून कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी जातात. त्यापूर्वी अंधशाळेतील आपल्या मित्रांसोबत छोटे-छोटे आकाशकंदील तयार करून इतरांची दिवाळी प्रकाशमान करतात. 

अंधत्वावर मात करत ही मुले दीपोत्सव उत्साहात साजरा करतात. कुणी मनोमनी प्रकाशाची कल्पना करून तेजाचे दीप उजळतं, तर कोणी आकाशकंदील, पणत्या बनवतं. कुणी भरपूर वाचन करत, तर कोणी दिवाळीच्या फराळावर मनसोक्त ताव मारतं. त्यांना दृष्टी नसली तरी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच ते दिवाळीचा आनंद घेतात. दिवाळीत वाजणाऱ्या फटाक्‍यांबाबत त्यांना मोठे आकर्षण असते. त्यामुळे एखादा मोठा फटाका वाजला तर त्याच्या आवाजावरून, वासावरून तो फटाका कोणता याची जणू स्पर्धाच त्यांच्यात लागते.

आकाशात उडणाऱ्या रॉकेटचा आवाज ते चटकन ओळखतात. त्यांच्या दिवाळीच्या उत्सवात प्रकाशाच्या वाटा उजळविण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यक्ती पुढाकार घेतात. दिवाळीपूर्वीच त्यांच्या जीवनात प्रकाश आणतात. दिवाळीसाठी लागणारे साहित्य, सुगंधी साबण, कपडे, उटणे, पणत्या यांचा गिफ्ट बॉक्‍स त्यांना देऊ करतात.

त्यांच्यासोबत फराळाचा आनंद घेतात. त्यांच्या या मायेच्या स्पर्शाने, भेटीने या अंध मुलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो.

त्यांची ‘अक्षर’ दिवाळी
त्यांना जरी आकाशकंदील, पणत्या, फटाके लावून दिवाळी साजरी करता आली नाही तरी ते ब्रेल लिपीतील दिवाळी अंक वाचून त्यांची दिवाळी साजरी करतात. अंधशाळेत ४ ब्रेल लिपीतील दिवाळी अंक येतात. या अंकातील माहिती, कथा, गोष्टी वाचण्याचा पुरेपूर आनंद घेतात. शिवाय अंधशाळेतील शिक्षक इतर दिवाळी अंकातील गोष्टी, लेख त्यांना वाचून दाखवतात. अनाप प्रेमचे प्रकाशवाटा, स्पर्शज्ञान, दृष्टी आणि ब्रेल जागृती त्रैमासिक हे दिवाळी अंक ही मुले वाचतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipawali Fesitval in Blind child school in Kolhapur