
कामेरी (सांगली)- सागाव (ता. शिराळा) येथील व सध्या कळंबा कोल्हापूर येथे रहाणा-या अक्षय घोलप यांच्या तिळ्या बालकांवर यशस्वी उपचार झाले. मात्र उपचारानंतर लाखोंच्या घरात असणारी बिलाची रक्कम कशाने भरायची ? या विवंचनेत असणा-या बापाची चिंता दानशूर मंडळी व डॉक्टरांच्या मदतीने मिटली. या चिमुकल्यांना डिस्चार्ज मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. दै. "सकाळ' मधून आर्थिक मदतीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र "लॉकडाउन' सुरु असतानाच दोन महिन्यांपुर्वी पोटात तिळे असणाऱ्या आईची उपचारासाठी धावाधाव सुरु होती. सर्वत्र बंदची परिस्थिती असताना कोल्हापूरातील नाईस नवजात हॉस्पिटलमधील डॉ. केसरकर यांच्या रुग्णालयात सातव्या महिन्यात इमर्जन्सी सिझरिंग करुन तिळ्यांचा जन्म झाला. वजनाने अत्यंत कमी म्हणजेच केवळ 900,1050 आणि 1100 ग्रॅमची दोन मुले आणि एक मुलगी जन्माला आली. यापैकी मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर बनली. नवजात शिशू उपचार विशेष तज्ज्ञ डॉ. विजय माळी यांनी बाळांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतला. माणुसकी आणि सामाजिक उत्तर दायित्व अशा दुहेरी भुमिकेतून व्यावसायिकतेस थोडा फाटा देत डॉ. माळी यांनी क्षणाचाही विलंब न लावता या बालकांवर उपचार सुरु केले. बालके "प्रिमॅच्युअर' असल्याने त्यांच्या फुफ्फुसे, मेंदू आतडे यांची आवश्यक वाढ झाली नव्हती.
अशा वेळी या बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आणि तेवढेच जिकीरीचे होते. अशी बालके स्वत: श्वास घेउ शकत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची गरज होती. मुलीला व्हेंटीलेटरवर तर दोन मुलांना सिपॅप (CPAP) मशिनव्दारे ऑक्सीजन सुरु केला. फुफ्फुसाची शक्ती वाढविणारी इंजेक्शन दोनवेळा बाळास देण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येउन तिन्ही चिमुकल्यांनी उपचारास प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. एवढेच नाही दुसऱ्या आठवड्यातच ऑक्सीजनची गरज कमी होऊ लागली. आतडी अत्यंत नाजूक असल्याने बाळांना दूध सुरु करुन त्यांचे वजन वाढविण्याचे मोठे आव्हान होते. आईचे दूध बाळासाठी मोलाचे असल्याने स्तनपान विशेष तज्ञ डॉ. स्नेहल माळी यांनी आईला स्तनपानाचा सल्ला देत घाबरलेल्या त्या मातेचा आत्मविश्वास वाढविला. सलग तीन आठवड्यांच्या यशस्वी उपचारानंतर चिमुकल्यांची परिस्थिती सुधारली.
अशातच बाळांचा रक्तदाब कमी होऊ लागला पेशींची संख्याही घटू लागली. एवढेच नाही तर अपरिपक्क लिव्हरमुळे बाळांना कावीळ झाली. त्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकाशात (फोटोथेरपी) ठेवावे लागले. नाजूक आतड्यांना सूज आल्याने त्यांना विशिष्ट प्रकारचे दूध देण्यात आले. याच काळात बाळांचे रक्त कमी झाल्याने त्यांना रक्त चढविण्यात आले. एक महिन्यानंतर मेंदूची व डोळ्यांची तपासणी केली असता नॉर्मल रिपोर्ट आला. त्यांच्यावर अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञानास उपचार पध्दत वापरली. यशस्वी उपचारानंतर या बालकांचे वजन 1500, 1500 आणि 1450 ग्रॅम झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तिळ्या बालकांच्या उपचारासाठी आठ लाखांचा खर्च आला. घोलप कुटुंबीयांच्या मदतीला अनेकजण धावून आले. डॉक्टरांनी ही बिलातील भरीव स्वरुपाची रक्कम कमी करुन दिलासा दिला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिळ्या बालकांसह घरी परतताना माता आणि पित्याच्या चेहऱ्यांवर समाधानाची लकेर पाहून सर्वांना आनंद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.