esakal | उदयनराजेंच्या कथित भाजप प्रवेशाला पक्षांतर्गत अडसराची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंच्या कथित भाजप प्रवेशाला पक्षांतर्गत अडसराची चर्चा

सातारा जिल्ह्यात निर्माण झाली आहे राजकीय कोंडी.

उदयनराजेंच्या कथित भाजप प्रवेशाला पक्षांतर्गत अडसराची चर्चा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या कथित भाजप प्रवेशाची चर्चा गेले पंधरा दिवस सुरू आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप प्रवेशाबाबत स्वतः उदयनराजेंनी अजून अवाक्षरही काढले नाही; मात्र जिल्ह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना पक्षात घ्यायला अनेक वर्षांपासून पायघड्या घालणाऱ्या भाजपमध्ये असे काय झाले, की त्याला एवढा विलंब लागतोय, असाही प्रश्‍न आता विचारला जावू लागला आहे. भाजपमधील अंतर्गत स्पर्धेमुळे हा विलंब होत आहे का, असेही जाणकार म्हणू लागले आहेत. ते काहीही असो, पण एकूणच या घडामोडींमुळे जिल्ह्यात कमालीची राजकीय कोंडी झाली आहे. 
भाजपशी टोकाचा संघर्ष करून खासदार झालेले उदयनराजे भोसले यांनी 20 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. ते मुंबईत प्रवेश करणार, सोलापूरला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार, राजीनामा द्या असा निरोप आला, अशा विविध बातम्या खास सूत्रांकडून बाहेर येत होत्या. या बातम्या येत होत्या म्हणजे तशी बोलणी होत होती, निरोपांची देवाण-घेवाण सुरू होती; परंतु आजअखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. 
मुख्यमंत्र्यांबरोबर उदयनराजेंची प्रवेशाची गणिते चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजेंच्या तशा फारशा किचकट मागण्याही नाहीत. विधानसभेबरोबर लोकसभा आणि प्रवेशाचा स्वतंत्र कार्यक्रम एवढाच काय तो विषय आहे. भाजपचे उदयनराजेंना पक्षात घेण्यासाठीचे यापूर्वीचे प्रयत्न आणि सध्या त्यांच्याकडे देशात असलेली सत्तास्थाने पाहता ही मागणी पूर्ण करणे तशी फारशी अवघड गोष्ट वाटत नाही. तरीही मुख्यमंत्र्यांच्या मनात असूनही ते पंधरा दिवस झाले साध्य होताना दिसत नाही. त्यातून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला पक्षातूनच अडसर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तशा आशयाचे प्रश्‍न प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले गेले. त्या वेळी "राजेंसाठी आम्ही काहीही करू,' असे ते म्हणाले. मात्र, विधानसभेबरोबर लोकसभा होणे अवघड असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे उदयनराजेंची मुख्य मागणीच पूर्ण होणार नाही, हे एक प्रकारे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळेच उदयनराजेंना ठोस आश्‍वासन मिळण्यात अडचणी आल्या आहेत. 
भाजप सत्तेत आल्यावर प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी चंद्रकांत पाटील अहोरात्र झटले आहेत. या भागात त्यांनी नेते व कार्यकर्तेही तयार केले. आताचे पश्‍चिम महाराष्ट्रातील झालेले प्रवेश पाहता चंद्रकांत पाटलांचाच त्यावर वरचष्मा दिसत आहे. साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेऊन त्यांनी बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे काम केले. उदयनराजेंच्या प्रवेशामुळे व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यात तयार झालेल्या नेतृत्वाच्या वर्चस्वाला धक्का निर्माण होऊ शकतो, या विचारातून उदयनराजेंचा प्रवेश लांबत नाही ना, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे. 

loading image
go to top