चर्चा भरणेंची वर्णी वळसे-पाटलांची 

प्रमोद बोडके
Thursday, 9 January 2020

आमदार बबनदादा शिंदे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रणिती शिंदे या कॉंग्रेसच्या तर शहाजी पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. या सहा पैकी एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. 

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदाने हुलकावणी दिली. मंत्रिपद हुकले आता सोलापूरचे पालकमंत्री कोण? याबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपद वर्णी लागेल अशी चर्चा असतानाच अचानकपणे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना आणखी दुसरा एक धक्का यानिमित्ताने बसला आहे. 
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांमुळे सोलापुरात कर्जमुक्तीला गती 
विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, राजन पाटील, सुधाकरपंत परिचारक हे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. या जुन्या नेत्यांच्या विरोधात काम करणारा नव्या नेतृत्वाचा गटही सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे. नव्या दमाचा गट हा कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडला गेला तर कधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जोडला गेला. राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या गटाला पवार जवळ करणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. सोलापूरचे पालकमंत्री वळसे पाटील हे शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पवारांचे हे विश्‍वासू सहकारी सोलापूर जिल्ह्यात येत्या काळात कशा पद्धतीने काम करणार? कोणाला सोबत घेणार आणि कोणाला डावलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा 
इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तामामा भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राज्यमंत्री भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली असती तर सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांच्या समर्थकांना चांगले दिवस येण्याची शक्‍यता होती. पालकमंत्री वाटपात राज्यमंत्री भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्‍यातील भरणे समर्थकांचा मोठा हिरमोड झाला आहे. सोलापूरने आजपर्यंत शरद पवार, आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर आणि युतीच्या काळात जगन्नाथ पाटील असे बाहेरचे पालकमंत्री पाहिले आहेत. आता वळसे-पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव टू सोलापूर असे नवीन नाते येत्या काळात तयार होणार आहे. 
ज्येष्ठ नेत्यांना अच्छे दिन? 
पालकमंत्री वळसे पाटील यांच्यासोबत पूर्वीपासून विधानसभेत काम केलेले विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, सुधाकरपंत परिचारक आज राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत नाहीत. बबनदादा शिंदे व राजन पाटील हे ज्येष्ठ नेते पक्षासोबत आहेत. वळसे पाटील यांच्यासोबत विधानसभेत आणि राष्ट्रवादीत केलेल्या कामाचा मोठा लाभ या नेत्यांना येत्या काळात होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion regarding mr. Bharane and appointed walse patil