वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत  
सकारात्मक चर्चा झाली.

सातारा : सातारा शहर, परिसराचा सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा मिळण्यासाठी हद्दवाढ होणे अत्यावश्‍यक असून, तो प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजेंनी दिली.
 
एक दिवसाच्या अधिवेशनादरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई येथे श्री. ठाकरे यांची भेट घेतली. सातारा शहराची हद्दवाढ, जावळी तालुक्‍यातील महत्त्वाकांक्षी बोंडारवाडी धरण आणि मेडिकल कॉलेज आदी विकासकामे मार्गी लावण्यासाठी श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

हेही वाचा -  ई-सकाळच्या ट्विटची रेल्वे प्रशासनाकडून दखल

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय असून, पालिकेने हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला असून, विधिमंडळात 2016 मध्ये तारांकित प्रश्‍नही केला होता. नगरविकास विभागाने सुचविलेल्या सर्व त्रुटींची पूर्तता पालिकेने केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजूर द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे दिली. शिवेंद्रसिंहराजेंनी श्री. शिंदे यांनाही लेखी निवेदन दिले. त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा - भगवान झाला लॉर्ड, आनंदचा हॅप्पी आणि छाया बनली शॅडो...
 
जावळी तालुक्‍यातील 54 गावांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पास मंजुरी मिळाली असली, तरी जलसंपदा विभागाच्या सातारा कार्यालयाकडून विंधन विवरे (ट्रायल पिट) घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी ट्रायल पिट घेणे अत्यावश्‍यक आहे.

ट्रायल पिट घेऊन बोंडारवाडी धरणाचे काम गतीने सुरू करावे, या मागणीसाठी शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे केली. संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन श्री. पवार, श्री. पाटील यांनी दिले.

नक्की वाचा -  वीरपत्नीला मोबाईलपासून ठेवलेले दूर
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करून उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाची सोय करणे काळाची गरज आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजसाठीच्या जागेचा प्रश्‍न निकाली काढून तातडीने कॉलेज उभारणीसाठी योग्य ती कार्यवाही व्हावी. हा प्रश्‍न जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा असून, तो मार्गी लावावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

हेही वाचा -  हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinghraje Bhosale Met Uddhav Thackreay In Mantralay