अदखलपात्र गुन्ह्यांचा 48 तासांत निपटारा!

- जालिंदर सत्रे
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पाटण - अदखलपात्र गुन्ह्यांची तत्काळ दखल घेऊन 48 तासांच्या आत फिर्यादी व प्रतिवादींना समोरासमोर घेऊन परिणामकारक कार्यवाही, समुपदेशन व तत्परता दाखवून कारवाई अशा उपाययोजनांच्या माध्यमातून पाटण पोलिस सदैव दक्ष अभियान राबवीत आहेत. या "पाटण पॅटर्न'ची पोलिस अधीक्षकांनी दखल घेत हे अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटण - अदखलपात्र गुन्ह्यांची तत्काळ दखल घेऊन 48 तासांच्या आत फिर्यादी व प्रतिवादींना समोरासमोर घेऊन परिणामकारक कार्यवाही, समुपदेशन व तत्परता दाखवून कारवाई अशा उपाययोजनांच्या माध्यमातून पाटण पोलिस सदैव दक्ष अभियान राबवीत आहेत. या "पाटण पॅटर्न'ची पोलिस अधीक्षकांनी दखल घेत हे अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी तत्परतेने दखल घेतली नाही तर फिर्यादीच्या मनात पोलिसांबद्दल नकारात्मक मत तयार होऊन अन्याय झाल्याची भावना निर्माण होते. त्याचबरोबर कारवाईमध्ये विलंब झाल्यास आरोपीचे मनोधैर्य उंचावून त्याच्या हातून गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा गुन्हा घडण्याची शक्‍यता असते. अशा प्रकारामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्‍यात येते. याचा परिणाम आरोपीच्या हातून शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे घडून फिर्यादीचे न भरून येणारे नुकसान होते.

अदखलपात्र गुन्हे कौटुंबिक वाद, अचानक उद्‌भवलेली भांडणे, राजकीय वैमनस्य व अनेक वर्षापासूनचे वितुष्ट अशा कारणांतून घडत असतात. पोलिसांनी दखल घेतली नाही तर पोलिस पक्षपातीपणा करतो, दखल घेत नाही, आमच्यावर अन्याय होऊनही न्याय मिळत नाही, अशी फिर्यादीच्या मनात भावना निर्माण होते.

पाटण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकरराव पांचाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून अदखलपात्र गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याची परिणामकारकता चार महिन्यांत दिसत आहे. ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत असताना फिर्यादीस सौजन्याची वागणूक देणे, दाखल गुन्ह्यांची माहिती बीट अंमलदारास देऊन 48 तासांच्या आत फिर्यादी व आरोपीस पोलिस ठाण्यात बोलावून घेण्याची प्रक्रिया राबविली जाते.

फिर्यादी व आरोपी समोरासमोर बसवून समुपदेशन व प्रतिबंधात्मक कारवाई करणे या उद्दिष्टांना प्राधान्य दिले जाते. गेल्या पाच महिन्यांत डिसेंबर 2016 अखेर 191 व फेब्रुवारी अखेरीपर्यंत या वर्षात 122 अशा एकूण 313 अदखलपात्र गुन्ह्यांची तत्काळ दखल घेतली गेली आहे. त्याचे दृष्य परिणाम पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकांत दिसून आले.

पाटण पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीवेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सदैव दक्ष अभियानाची प्रशंसा करताना हा उपक्रम "पाटण पॅटर्न' म्हणून जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

'पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव दक्ष अभियान राबविण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिस ठाण्यात हा उपक्रम यशस्वी झाला होता. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. जनसामान्यांमध्ये पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन, सुरक्षिततेची भावना व विश्वासार्हता निर्माण करून समाजात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर ताण येणार नाही.''

- शंकरराव पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक, पाटण पोलिस ठाणे

Web Title: disposed crimes within 48 hours!