विघ्नहर्त्याची मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसमोरही विघ्न 

दिलीप क्षीरसागर 
गुरुवार, 28 मे 2020

कामेरी (सांगली)- संपूर्ण जगावर "कोरोना' चे सावट आले असून अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर देखील विघ्न आले आहे. ऑगस्टमध्ये होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मोठ्या शहरांनी घेतला आहे. त्यामुळे मूर्तिकारांसमोरही आर्थिक संकट आले आहे. 

कामेरी (सांगली)- संपूर्ण जगावर "कोरोना' चे सावट आले असून अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर देखील विघ्न आले आहे. ऑगस्टमध्ये होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मोठ्या शहरांनी घेतला आहे. त्यामुळे मूर्तिकारांसमोरही आर्थिक संकट आले आहे. 

वाळवा तालुक्‍यातील कामेरी, इस्लामपूर, साखराळे आदी परिसरात मूर्तिकार मोठ्या प्रमाणात आहेत. दसऱ्यानंतरच मूर्ती बनवण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. मूर्ती बनवण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते. काही मूर्तिकारांच्या हाताखाली कामगार काम करतात. त्यांचा पगार द्यावा लागतो. परिसरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविल्या जातात. त्यावरही पुढच्या वर्षापासून बंदी येणार आहे. त्यामुळे यावर्षी फक्त या मूर्ती बनवण्याबाबत दिलासा मिळाला आहे. मूर्ती बनवण्यासाठी उधारीवर प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, ब्रश आदी साहित्याची मोठी खरेदी ही केली आहे. तीन फुटापासून ते दहा फुटांपर्यंत पर्यंत मूर्तीही बनवलेल्या आहेत. घरगुती लहान गणपती बनवायला हाती घेतले आहेत. उधारीवर आणलेला मालाची बीले उत्सवात झालेल्या विक्रीतून भागविली जातात. मागच्या हंगामात पुराचे मोठे सावट गणेशोत्सव काळातच आले. आता यावर्षी उत्सवापूर्वीच कोरोनाचे विघ्न आले आहे. 

यंदा मोठ्या शहरातील गणेश मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आकर्षक देखावे न करता साधेपणाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल असे सांगण्यात येते. मोठ्या मूर्तींऐवजी छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्या जातील. त्यामुळे मोठ्या मूर्तींची विक्री होईल की नाही? याची धास्ती आत्तापासूनच मूर्तिकारांना लागली आहे. काही मोठी सार्वजनिक गणेश मंडळे चार महिने अगोदरच ऍडव्हान्स रक्कम देत होते. आता अवघड परिस्थिती होऊन बसली आहे. 
 

""वर्षभर आम्ही गणेश मूर्ती बनवण्याचे काम करत असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असलेने हा उत्सव मोठा साजरा होतोय की नाही याची भीती वाटू लागली आहे. कारागिरांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तरी शासनाने आम्हास आर्थिक मदत करावी.'' 
-अजय क्षीरसागर (मूर्तिकार,कामेरी) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption even in front of the artisans