जि .प. अध्यक्ष, सभापतींनी पळवला निधी; बोट खरेदीला पैसे नव्हते, मग हे कुठून आले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि चार सभापतींनी स्विय निधीतून तब्बल 49 लाख रुपयांची रक्कम कुणाला विश्‍वासात न घेता आपापल्या गटातील गावांना दिली आहे.

सांगली ः जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि चार सभापतींनी स्विय निधीतून तब्बल 49 लाख रुपयांची रक्कम कुणाला विश्‍वासात न घेता आपापल्या गटातील गावांना दिली आहे. कोरोना उपाययोजनांच्या नावाखाली ही अन्य सदस्यांची शुद्ध फसवणूक आहे. महापुराच्या संकटात बचावासाठी बोट खरेदीला आम्ही सात सदस्यांनी एकेक लाख रुपयांची मागणी केली तेंव्हा पैसे नव्हते. आता केवळ 20 गावांमध्येच कोरोना आल्याच्या अविर्भावात हा निधी का वाटला, असा सवाल कॉंग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी केला आहे. 

ते म्हणाले, ""जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या मतदार संघातील म्हैसाळ, बोलवाड, टाकळी आणि खुद्द त्यांचे गाव असलेल्या विजयनगरमध्ये तब्बल 17 लाखांचा निधी देण्यात आला आहे. उपाध्यक्ष डोंगरे यांनी आठ लाखांचा निधी नेला आहे. सभापती जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, आशा पाटील आणि सुनिता पवार यांनीच सूचवलेल्या गावांमध्ये हा निधी गेल्याचे लक्षा येते.'' 

या साऱ्यावर आक्षेप घेताना जितेंद्र पाटील म्हणाले, ""जिल्हा परिषदेत नेमके काय सुरु आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांनी आपल्या गटात इतरांपेक्षा अधिक निधी न्यावा, हे अपेक्षित आहेच, मात्र असा दुजाभाव याआधी कधीच झाला नव्हता. आम्हा सदस्यांना गटासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये दिले. पदाधिकाऱ्यांनाही ते मिळाले. त्याशिवायचा हा निधी आहे. कोरोना संकटात उपाययोजना करायला आमची हरकत नाही, मात्र या वीस गावांतच कोरोना आहे का? हा निधी राखीव ठेवता आला असता. मणदूरसारख्या गावात आता प्रचंड निधीची गरज आहे. तेथे देता आला असता. अन्य गावांत गरजेनुसार कामे करता आली असती. ग्रामपंचायतींनी आधीच सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी वित्त आयोगातून केलेली आहे. तेथे आता नवीन काय खर्च करणार आहात? हा सारा चुकीचा प्रकार आहे. हा निधी कशावर खर्च केला याचा हिशेब मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मागावा. तो आम्हालाही मिळावा. या निधीची स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे.'' 

या गावांमध्ये गेले पैसे 

पेड ः 2 लाख 99 हजार, विजयनगर ः 4.50 लाख, वड्डी ः 2 लाख, बोलवाड ः 2 लाख, टाकळी ः 2.50 लाख, बिसूर ः 2 लाख, वाझेगाव ः 40 हजार, कर्नाळ 1.50 लाख, बामणोली ः 1 लाख, खोतवाडी ः 60 हजार, माधवनगर ः 1.90 लाख, हरिपूर ः 2.50 लाख, बेडग 2.50 लाख, पेठ ः 4 लाख, येलूर ः 4 लाख, म्हैसाळ ः 6 लाख, सनमडी ः 2 लाख, कुणीकोणूर ः 1.25 लाख, वायफळे ः 1.75 लाख, निगडी बुद्रुक ः 1 लाख, बोबलाद ः 2.50 लाख. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dist. President, Speaker squandered funds