सांगली जिल्ह्यात रेशनिंगचे धान्य वाटप ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

धान्य दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून धान्य वाटप थांबवले आहे. दुकानदारांकडे धान्य आलेले आहे. प्रत्येक महिन्यात 5 तारखेपासून धान्याचे वाटप सुरु केले जाते.

सांगली ः जिल्ह्यातील 1356 रेशन दुकानदारांकडून गेली बारा दिवस विविध मागण्यांसाठी धान्य वितरण बंद ठेवले आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मोफत धान्याचे रिबेट किंवा मानधन मिळावे, पॉज मशिनशिवाय धान्य वाटप कोरोना साथ संपेपर्यंत सुरु ठेवावे आदी मागण्यांचा समावेश आहे. धान्य दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून धान्य वाटप थांबवले आहे. दुकानदारांकडे धान्य आलेले आहे. प्रत्येक महिन्यात 5 तारखेपासून धान्याचे वाटप सुरु केले जाते. सध्या वाटप बंद असल्यामुळे सर्व समान्यांच्या अडचणीत भर पडते आहे. जिल्ह्यात नियमीत धान्य खरेदी करणारे 3 लाख 10 हजारावर शिधापत्रिका धारक ग्राहक आहेत.

 
कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरित करण्यासाठी पुन्हा आदेश न केल्याने 1 सप्टेंबरपासून राज्याप्रमाणे जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत, असा इशारा संघटनेने यापूर्वीच जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाव्दारे दिला होता. मात्र, याकडे शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रेशन दुकानदारांनी एक सप्टेंबरपासून धान्य वितरण बंदच्या निर्णयात 100 टक्के दुकानदार सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश ऑगस्टमध्ये मिळाल्याने गेल्या महिन्यात वाटप करण्यात आले. परंतु, त्या पद्धतीने धान्य वाटप करताना ऑगस्टमध्ये दुकानदारांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले होते. 

कोरोनामुळे भिती 
सर्व्हर बंद, मशीन बंद, ग्राहकांची रांग तशीच राहते. गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा व हात स्वच्छ ठेवा, या सर्व सूचनांचा वापर ग्राहकांकडून होत नाही. कोरोनामुळे राज्यात 25 रेशन दुकानदार मृत्युमुखी पडले असून, रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of ration grains in Sangli district stalled