
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचा ठराव जमा करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सदस्य संस्थांना ठराव पाठवण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचा ठराव जमा करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सदस्य संस्थांना ठराव पाठवण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. सदस्य संस्थांचे ठराव दाखल करून घेण्यासाठी तालुका उपनिबंधकांना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी आदेश दिले आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार राज्यात सहा टप्प्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहे. सांगली जिल्ह्यातही सहा टप्प्यात 1528 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे स्थगित झालेल्या 173 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या 173 संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश आहे. 173 पैकी 73 संस्थांची अंतिम मतदार यादी निश्चित झाली आहे. त्यामुळे 18 जानेवारीनंतर या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गतवर्षी सदस्य संस्थांकडून ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 2 जानेवारी ते 31 जानेवारी 2020 अखेर सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागवण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु त्यानंतर सहकार विभागाने 27 जानेवारीला आदेश काढून स्थगिती दिली. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे स्थगिती 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 12 रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्राधिकरणच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेचा स्थगित झालेला ठराव जमा करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ज्या सदस्य संस्थांनी पूर्वी ठराव जमा केले नसतील त्यांना 25 जानेवारीपर्यंत तालुका उपनिबंधकांकडे ठराव जमा करण्याची मुदत दिली आहे. याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
संपादन : प्रफुल्ल सुतार