"तनपुरे' टिकावा ही जिल्हा बॅंकेची इच्छा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

"डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची कामगिरी आजवर जिल्ह्यात उत्कृष्ट राहिली आहे. जिल्हा बॅंकेनेही कारखान्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कायम सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. थकबाकी शंभर कोटींच्या पुढे जाऊन बॅंकही अडचणीत येईल.

नगर : ""डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची कामगिरी आजवर जिल्ह्यात उत्कृष्ट राहिली आहे. जिल्हा बॅंकेनेही कारखान्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कायम सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. थकबाकी शंभर कोटींच्या पुढे जाऊन बॅंकही अडचणीत येईल, त्यामुळे बॅंकेलाही नियमानुसार कारवाई करून कारखान्याचा ताबा घ्यावा लागेल. शेतकऱ्यांची कामधेनू टिकावी, हीच जिल्हा बॅंकेची भावना आहे,'' असे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सरव्यवस्थापक किशोर भिंगारकर, सिद्धार्थ वाघमारे, जनसंपर्क अधिकारी भारत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा वाडिया पार्कमधील ते बांधकाम अखेर पाडले  

तहसीलदारांनी ताबा घेऊन बॅंकेकडे सुपूर्द केला 
गायकर म्हणाले, ""जिल्हा बॅंक संचालक मंडळाने 12 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या सभेत कर्जवसुलीसाठी कारखाना ताब्यात घेण्याचे ठरविले. वसुली न झाल्याने बॅंकेने प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक करून सप्टेंबर 2014 मध्ये कारखान्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताबा मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. 28 जुलै 2015 रोजी प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांनी कारखान्याची देवळाली प्रवरा, बेलापूर व चिंचविहिरे येथील मिळकतीची लिलावाद्वारे विक्री करून कर्जवसुली करावी, असे सांगण्यात आले. मात्र, विक्री होऊ शकली नाही. 24 एप्रिल 2017 रोजी राहुरी तहसीलदारांनी कारखान्यातील सर्व मालमत्तेचा ताबा घेऊन ती बॅंकेकडे सुपूर्द केली.'' 

हेही वाचा दराडे यांनी लढविली एकाकी खिंड 

मंडळाने कारखाना चालू ठेवला 
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांची कामधेनू पूर्ववत होण्यासाठी पुढाकार घेतला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीदेखील मध्यस्थी केली, असे सांगून गायकर म्हणाले, की कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाल्यावर नवे संचालक मंडळ अस्तित्वात आले. 17 एप्रिल 2017 रोजी कारखान्याच्या सर्व कर्ज खात्यांचे पुनर्गठन केले. हप्ते पाडून दिले. बॅंकेने फक्त शेतकरी व कामगारहिताचा विचार केला. 2017-18 व 2018-19मध्ये संचालक मंडळाने कारखाना चालू ठेवला. 

नियमानुसार कारवाई 
दोन वर्षांत व्याजापोटी अनुक्रमे एक कोटी 15 लाख व 13 कोटी 68 लाख 41 हजार रुपयांचा भरणा बॅंकेत दिला. मात्र, अपेक्षित भरणा मिळाला नाही. 25 मे 2019रोजी अकरा कोटी 25 लाख 35 हजार थकीत झाले. 2019-20मधील वसुली 21 कोटी 49 लाख 42 हजार वसूल होऊ शकणार नाही. ही संचालक मंडळाची जबाबदारी होती. परंतु त्यांनी कराराचा भंग केला. त्यामुळे जिल्हा बॅंक अडचणीत येत असल्याने नियमानुसार कारवाई केली जाईल. 

हेही वाचा खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप 
 

हे विखेंचेच कारस्थान : शिवाजी कर्डिले 
याबाबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप करत माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, ""शेतकरी व कामगारांची कामधेनू पुनरुज्जीवित व्हावी यासाठी आपण पुढाकार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी विनंती केली. त्यामुळे कारखाना संचालकांच्या ताब्यात देऊन सुरू केला. मात्र, 42 कोटी रुपये थकले. कामगारांचेही पगार थकवले. विखे पिता-पुत्रांनी फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूनेच "तनपुरे' ताब्यात घेतला का? लोकसभेची निवडणूक झाली की हात वर केले. थकबाकीमुळे कारवाई झाली की बॅंकेवर ठपका ठेवण्याचा यांचा बेत दिसतो. नियमानुसार कारवाई झाली, तर विखेंचेच कारस्थान कारखान्याला भोवणार आहे!'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Bank wants Tanpure sustainability!