शेवगावच्या डॉक्‍टरची गोदावरीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

शिवांजली हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. बोडखे रविवारी (ता. नऊ) पुणे येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंदच होता.

शेवगाव : कायगाव टोके (ता. नेवासे) येथील पुलावरून गोदावरी नदीत उडी घेऊन येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज हरिभाऊ बोडखे (वय 42) यांनी आत्महत्या केली.

कालपासून होते गायब 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवांजली हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. बोडखे रविवारी (ता. नऊ) पुणे येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंदच होता. त्यानंतर काल (सोमवारी) दुपारी दोनच्या सुमारास पुणे-औरंगाबाद महामार्गावर कायगाव टोके येथील जुन्या पुलावर त्यांची मोटर (एमएच 16 बीझेड 2055) बेवारस स्थितीत आढळून आली. 

मृतदेह तरंगताना आढळला
मागील दोन दिवसांपासून परिसरात पोलिस, नातेवाईक व मित्रमंडळी त्यांचा शोध घेत होते. अखेर आज दुपारी 12च्या सुमारास नदीतील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरासह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येमागे तर्कवितर्क

वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित व निष्णात डॉ. बोडखे यांच्या आत्महत्येबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या मागे आई-वडील, डॉक्‍टर पत्नी, बहीण, मुलगी, मुलगा, असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ बोडखे यांचे ते चिरंजीव होत. त्यांची पत्नी पुणे येथील खासगी रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Bodakhe suicide in Godavari