esakal | बार्शीचे डॉ. बी. एम. नेने यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

The Doctor Nene dies in Pune

बार्शी येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभारणीत डॉ. नेने यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. केवळ ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग करिअरचा त्याग करत बार्शी येथे सेवा बजावली. त्यांनी लंडन सोडून बार्शी येथे सामान्य रुग्णांची सेवा देण्यात आपले आयुष्य खर्ची घातले. बार्शीचे नाव वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कामही डॉ. नेने यांनी केले आहे.

बार्शीचे डॉ. बी. एम. नेने यांचे निधन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशात वैद्यकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेले डॉ. बी. एम. नेने (वय 80) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. 
देशभर प्रसिद्ध असलेले बार्शी येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभारणीत डॉ. नेने यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. केवळ ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग करिअरचा त्याग करत बार्शी येथे सेवा बजावली. त्यांनी लंडन सोडून बार्शी येथे सामान्य रुग्णांची सेवा देण्यात आपले आयुष्य खर्ची घातले. बार्शीचे नाव वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कामही डॉ. नेने यांनी केले आहे. डॉ. बी. एम. नेने यांच्या निधनाचे वृत्त समजताच बार्शीसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. नेने यांचे पार्थिव बार्शी येथे सुभाषनगर येथील निवासस्थानी सोमवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी साडेअकरा वाजता मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

डॉ. भगवान नेने यांचा अल्प परिचय 

डॉ. भगवान नेने यांचा जन्म 27 सप्टेंबर 1940 रोजी मिरज येथे झाला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल, प्रथम वर्ष सेंट जेव्हियर्स कॉलेज मुंबई, वैद्यकीय शिक्षण ग्रॅंट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे होऊन 1962 मध्ये एम. बी. बी. एस. पदवी घेतली. 1968 मध्ये एम. डी. पदवी घेतली. तर एमआरसीपी लंडन ही पदवी 1970 मध्ये मिळवली. 
न्यूरॉलॉजी, न्यूरो सर्जरी, पॅथॉलॉजी, हिमॅटॉलॉजी, जनरल मेडिसीन, सांसर्गिक रोग यात त्यांनी विशेष संशोधन केले होते. एफआरसीपी लंडन ही पदवी जून 2000 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आली. अश्‍विनी रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलिफ सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 1980 मध्ये संस्थापक नर्गीस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी करून त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांनी धुरा सांभाळली. 
एक हजार 143 खेड्यांना भेट देऊन कॅन्सरविषयी जनजागृती करताना 15 लाख ग्रामीण भागातील नागरिकांना, विशेषतः महिलांना घरोघरी जाऊन भेट दिली व माहिती सांगितली होती. कॅन्सर बरा होतो, असे रुग्णांच्या मनात त्यांनी बिंबवले. 25 हजार रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले. प्राथमिक अवस्थेत कॅन्सर असलेल्या एक लाख 40 हजार स्त्रियांना पूर्णपणे मोफत उपचार करून सेवा दिली. 
डॉ. नेने यांनी तीन हजार कॅन्सर रुग्ण पडताळणी कॅम्प घेतले. 15 ट्रेनिंग कॅम्प घेतले. या कॅम्पमध्ये चंडीगड, छत्तीसगड, थायलंड, नॉर्थ अफ्रिका, श्रीलंका, इंडिनोशिया, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. नेने यांचे 30 रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलला 27 विदेशांतील व्हीजिटर्सनी भेट देऊन पाहणी केली होती. जेआरडी टाटा यांनी सुवर्णपदक देऊन डॉ. नेने यांचा गौरव केला होता. दिल्ली नॅशनल ऍवॉर्ड, शासनाचा जनकल्याण पुरस्कार 2013 मध्ये देऊन गौरव झाला होता. 30 पेक्षा ऍवॉर्ड त्यांना देऊन गौरवण्यात आले होते.