डॉक्टर्स दिनानिमित्त : कोरोना नियंत्रण सर्वांची जबाबदारी

डॉ. अनिल मडके
Wednesday, 1 July 2020

आज 1 जुलै.. डॉक्‍टर्स डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने हा एकूणच काळ काही "साजरे' करावे असे वाटण्यासारखा नाही.

आज 1 जुलै.. डॉक्‍टर्स डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने हा एकूणच काळ काही "साजरे' करावे असे वाटण्यासारखा नाही. कारण हा काळ करोनाचा आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये वुहान (चीन) मधून बाहेर पडलेला कोरोना विषाणू अजूनही शांत व्हायचे नाव घेत नाही. भारतातील संसर्गबाधितांचा आकडा पाच लाखांवर गेला आहे. जमेची बाजू म्हणजे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरातल्या मृत्युदरापेक्षा खूप कमी आहे. ही बाब समाधान मानून राहावे अशी नाही. मृत्युसंख्या वाढू नये असाच निकराचा प्रयत्न जारी राहायला हवा. 

कोरोनाविरुद्धचा लढा अद्याप सुरुच आहे. या लढ्यात जे प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येतात आणि येत आहेत अशा डॉक्‍टर्स आणि नर्सेसना किंबहुना एकूणच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर साहजिकच "डॉक्‍टर्स डे'च्या निमित्ताने काय संदेश द्यायचा किंवा काय संवाद साधावा असा प्रश्‍न पडतो. एक मात्र सगळ्यांनाच सांगावेसे वाटते की, डॉक्‍टरांनीही स्वतः सुरक्षित राहून रुग्णसेवा देण्यासाठी सिद्ध असायला हवे. कोरोना हा गंभीर आजार आहे हे खरे असले तरी कोरोनाबरोबरच इतरही रुग्ण आपल्यासोबत आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.

आता वातावरण बदलले आहे. पावसाळा सुरु झाला आहे. अशा काळात दमा, सीओपीडी, हृदयविकार यासारखे आजार डोके वर काढत आहेत. ज्यांना कोरोना नाही परंतु इतर दीर्घकालीन आजार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहे, असे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यव्यवस्था सदैव सुसज्ज असणे गरजेचे आहे. पाश्‍चात्त्य देशांत सर्व आरोग्य सुविधा आधुनिक दर्जाच्या आहेत असा आपला समज होता, तेथे कोरोनामुळे मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे.

भारतात त्यामानाने मृत्युसंख्या कमी आहे. याचा अर्थ कायम तंत्रज्ञानावर अवलंबून चालणार नाही. रुग्णाचा इतिहास विचारात घेणे, रुग्णाशी संवाद साधणे आणि रुग्णाचा सर्वंकष विचार करणे आज खूप महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्ण आणि कोरोना नसलेल्या रुग्णाकडे केवळ यांत्रिकतेने न पाहता वैद्यकीय पेशातील समर्पणभावनेचा अंगीकार करून रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेवले पाहिजे. 

"डॉक्‍टर्स डे' साजरा करता येत नसला तरी त्या निमित्ताने सर्व डॉक्‍टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन आणि जनता यांना आरोग्यदायी शुभेच्छा !!!  

 

डाॅ. अनिल मडके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors' Day: Corona control is everyone's responsibility: Dr. Anil Madke