नववर्षानिमित्त नवयुवकांचा वंचित मुलांसाठी "डोनेशन बॉक्‍स'

Smaran
Smaran

सोलापूर : एकीकडे गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित मुलांना अनवाणी फिरावे लागते. अंगभर कपडेसुद्धा नशिबी नसते तसेच एकवेळच्या जेवणाची भ्रांत असते. मात्र दुसरीकडे व्यसनांच्या आहारी जाऊन पैशाचा चुराडा व आरोग्याचेही नुकसान करून घेणारी माणसे आपल्याला दिसून येतात. अशी विरोधाभास दृश्‍ये पाहून कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंचित घटकांसाठी समाजकार्य करण्याच्या विचाराने नव्या वर्षात नागरिकांना "व्यसने सोडून वंचितांना मदत करा' असे आवाहन केले आहे.

मलाही शिकायचंय, मलाही जगायचंय!
ज्ञानेश्‍वर गवते, प्रथमेश राऊत, प्रशांत राऊत, संकेत कोनाळे, पारस पाटील, ओम होळे, रोहित पाटील या नवयुवकांनी समाजातील वंचित घटकांना मदत करण्याच्या विचाराने येथील इलेक्‍ट्रिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मंदार कुलकर्णी याच्या मार्गदर्शनाखाली "स्मरण बहुउद्देशीय सामाजिक संघटना' स्थापन केली आहे. वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. तसेच समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करून, व्यसन करणाऱ्यांनी व्यसन कमी करून ती रक्कम वंचित मुलांच्या शिक्षण, आरोग्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्याचा समाज सुधारणात्मक विचार या नवयुवकांच्या मनात आला. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नूतन वर्षापासून करण्याचे ठरले व त्यांनी पाच-सहा काचेचे डोनेशन बॉक्‍स बनवून घेतले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी शहरातील पानटपरी चालकांकडे "मलाही शिकायचंय, मलाही जगायचंय' असा मजकूर लिहिलेले डोनेशन बॉक्‍स ठेवले आहेत.

पहिल्या दिवशी फक्त 22 रुपये जमा
नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका पानटपरीवरील डोनेशन बॉक्‍समध्ये दिवसभरात फक्त 22 रुपये जमा झाले. जनजागृती होईल व या उपक्रमाचे महत्त्व कळाल्यावर मोठ्या प्रमाणात मदत जमा होईल, अशी आशा नवयुवकांनी बाळगली आहे. लहान वयात सुरू केलेल्या विधायक उपक्रमाला नागरिकांनीही सहकार्य केल्यास त्यांना भविष्यात समाजोपयोगी इतर उपक्रम राबवण्यास मदत होईल, असे आवाहन कर्णिकनगर येथील रहिवासी व्यंकटेश कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना केले.

शिक्षणापासून वंचित मुलांपर्यंत पोचवणार आर्थिक मदत
गरिबीमुळे काही मुलांना शिक्षण व दैनंदिन गरजांपासून वंचित राहावे लागते. याचा विचार करून स्मरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी पानटपऱ्यांवर डोनेशन बॉक्‍स ठेवण्यात आले आहेत. जमा झालेला निधी शिक्षणापासून वंचित अशा घटकांपर्यंत पोचवून त्यांना आर्थिक मदत करणार आहोत. महाविद्यालये व शाळांमध्येही बॉक्‍स ठेवणार आहोत.
- मंदार कुलकर्णी, अध्यक्ष, स्मरण बहुउद्देशीय सामाजिक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com