सांगलीचे फुप्फुस- आमराईला नख लावू नका...!

शैलेश पेटकर
Monday, 4 January 2021

आमराईत मिनी ट्रेन-सेल्फी पॉंईट असे आमराईच्या पर्यावरणाच्या मुळावर उठणाऱ्या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी सजगन नागरिकांना काय वाटते? 

सांगलीच्या मध्यवर्ती असं ऑक्‍सीजन पार्क म्हणजे आमराई. ते शहराचं फुफ्फुसच आहे. सुमारे 1700 प्रकारच्या विविध वृक्षराजींनी नटलेही ही आमराई केवळ बाग नसून तीचं पर्यावरणीय महत्व अमुल्य असंच आहे. त्याचे बॉटानिकल गार्डन म्हणून तिचं महत्व कायम राखलं पाहिजे यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. सध्याच्या पिढीला हे ज्ञात नसावे. मात्र आता पुन्हा एकदा ती वेळ आली आहे. आमराईला नख लावू नका अशी आर्त हाक शहरवासियांची आहे. या आमराईत मिनी ट्रेन-सेल्फी पॉंईट असे आमराईच्या पर्यावरणाच्या मुळावर उठणाऱ्या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी सजगन नागरिकांना काय वाटते? 

वनसंपदेबद्दल आस्था-जागृती केली पाहिजे
आमराई शहरातील एकमेव बऱ्यापैकी प्रदुषणमुक्त असे उद्यान आहे. ती केवळ बाग नाही तर सांगलीकरांसाठी देणगीच आहे. इथल्या प्रत्येक झाडांची यादी शास्त्रीय माहितीचे फलक आता नव्याने प्रसिध्द करून जनतेत-मुलांमध्ये वनसंपदेबद्दल आस्था-जागृती केली पाहिजे. योगासने..ध्यान धारणा करण्यासाठी इथे अनेक सांगलीकर सकाळच्या प्रहरी येतात. आता तिथे गोंगाट निर्माण करणे कितपत योग्य ठरेल याचा विचार प्रशासनाने करावा. अशा गोष्टींसाठी शहरात शेकडो भुखंड पडून आहेत.
- एस. जी. नूलकर, योगशिक्षक 

आमराईची शांतताच संपवण्याचा डाव

काही दिवसांपूर्वी आमराईत उद्यानात वखार केली. आम्ही आंदोलन केले होते. त्यानंतर इथली लाकडे हटवली. इथे फुड पार्क करून चौपाटी करण्यात येणार होती तेही आम्ही रोखले. आता मिनी ट्रेनच्या माध्यमातून पुन्हा आमराईची शांतताच संपवण्याचा डाव आहे. सर्व सजग नागरिकांना सोबत घेऊन ते रोखले जाईल. '' 
- बलदेव गवळी, स्थानिक नागरीक 

वनस्पतींवर विपरित परिणाम होईल

मिनी ट्रेनमुळे धुर आणि शांतता आमराईची शांतता भंग होईल. अडीचशे मीटरचा ट्रेनचा टॅक असला तरी तिथे होणाऱ्या डिझेलच्या धुरामुळे दुर्मिळ वनस्पतींवर विपरित परिणाम होईल. असे प्रकार भविष्यात आमराईचे वाळवंट करण्यास निमित्त ठरतील. मुलांच्या खेळण्यासाठी शहरात अशा कैक जागा आहेत. अगदी कृष्णाकाठ परिसरातही अशा व्यवस्था कराव्यात. पण आमराईत असे करणे अयोग्य ठरेल.
- पापा पाटील, पर्यावरणवादी कार्यकर्ते 

अतिक्रमणांनाही हटवले पाहिजे
आमराईतील फुड पार्कचा प्रस्ताव नागरिकांनी हाणून पाडला. आमराई आमराई राहिली पाहिजे यासाठी आमराईसाठीच्या समितीने निर्णय केले पाहिजेत. इथल्या अन्य अतिक्रमणांनाही हटवले पाहिजे.
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 

आमराईतील कोणतेही बांधकाम बेकायदा
आमराईतील कोणतेही बांधकाम अथवा पर्यावरणबाह्य कृती बेकायदा ठरेल. आमराई फक्त देखभालीसाठी महापालिकेकडे आहे. गणपती पंचायतनच्या संमतीशिवाय इथे कोणतीही कृती महापालिकेला करता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील इथल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर तक्रारींवर निर्णय करावे असे शासनाचे आदेश आहेत. त्याचा पालिकेला विसर पडला आहे. अशा कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची रितसर तक्रार केली जाईल. प्रसंगी न्यायालयात खेचले जाईल.
- शेखर माने, शिवसेना नेते 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don't touch Sangli's lungs- Amrai