esakal |  चिंता नको; चांदोलीत पुरेसा पाणीसाठा

बोलून बातमी शोधा

Don't worry; Adequate water storage in Chandoli dam}

फेब्रुवारी अखेर चांदोली धरणात 25.72 टीएमसी पाणीसाठा असून गतवर्षच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले. 

 चिंता नको; चांदोलीत पुरेसा पाणीसाठा
sakal_logo
By
शिवाजीराव चौगुले

शिराळा (जि. सांगली) : फेब्रुवारी अखेर चांदोली धरणात 25.72 टीएमसी पाणीसाठा असून गतवर्षच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले. 

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात चांदोली येथे वारणा नदीवरील या धरणाचा कागदोपत्री वारणा धरण; तर नेहमीच्या वापरात चांदोली असा नेहमी उल्लेख केला जात आहे. वारणा नदीवर असल्याने वारणा, तर चांदोली येथे बांधल्याने चांदोली धरण असा दुहेरी नावाचा उल्लेख सतत होत असतो. धरणाच्या पाणी साठ्याला वसंतसागर जलाशय म्हणून ओळखले जाते.

या धरणाची पाणी साठवण क्षमता 34.50 टीएमसी आहे. पाणी टंचाईच्या काळात याच धरणाच्या पाण्याने लातूरकरांची तहान भागवली आहे. सिंचन हा मुख्य हेतू असला तरी विद्युत निर्मितीलाही या धरणाचा फायदा झाला आहे. वारणा जलविद्युत प्रकल्पातून 16, तर चांदोली- सोनवडे प्रकल्पातून 4 मेगावॉट अशी एकूण 20 मेगावॉट विद्युत निर्मिती दोन ठिकाणी केली जात आहे. 

या धरणातून शेती व पिण्यासाठी वारणा कालवा व वारणा नदीतून पाणी सोडले जाते. तर वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पाणी करमजाई तलावात सोडून त्या ठिकाणाहून कऱ्हाड तालुक्‍यातील व शिराळा तालुक्‍यातील गावांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील दक्षिण मांड व शिराळा तालुक्‍यातील मोरणा नदी काठच्या पिकांना जीवदान मिळू लागले आहे. 
गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

कारण मागीलवेळी अतिवृष्टी व परतीचा पाऊस झाला होता. त्या प्रमाणात यावर्षी पाऊस झाला नाही. मात्र सध्या असणारा पाणीसाठा हा मुबलक असल्याने चांदोलीच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने कूपनलिका, विहिरी व पाझर तलावांच्या पाणी पातळीत ही घट होऊ लगली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत ही घाट होणार असली, तरी त्याचा परिणाम शेतीच्या अथवा पिण्याच्या पाण्यावर होणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

पाणीसाठा 

  • फेब्रुवारी 2020 :2 6.40 टीएमसी 
  • फेब्रुवारी 2021 : 25.72 टीएमसी 
  • धरणाची पाणी पातळी : 617.15 मीटर 
  • पावसाची नोंद : 2680 मीमी 

धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा

धरणात गत वर्षाच्या तुलनेत जवळपास अर्धा टी. एम.सी.पाणीसाठा कमी असला तरी धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. 
- मिलिंद किटवाडकर, सहायक अभियंता, वारणा प्रकल्प 

संपादन : युवराज यादव