esakal | डॉ. दिनेश नाशीपुडींचे अनोखे आंदोलन; उद्यानाची स्वच्छता करुन वेधले लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

corporation

डॉ. दिनेश नाशीपुडींचे अनोखे आंदोलन; उद्यानाची स्वच्छता करुन वेधले लक्ष

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी महांतेशनगरमधील उद्यानाच्या स्वच्छतेच्या माध्यमातून सोमवारी (ता. १३) गांधीगिरी केली. सदर उद्यान महापालिकेच्या मालकीचे असून सुमारे ४० लाख रुपये खर्चातून उद्यानाची सुधारणा केली आहे. मात्र, सध्या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आहे.

उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी उपकरणे, मॉर्निंग वॉकर्ससाठी वॉकींग ट्रॅक, फुलझाडेही आहेत. महापालिकेने उद्यान कर्मचारी तैनात करुन उद्यानाची स्वच्छता करणे आवश्‍यक होते, पण महापालिकेच्या आरोग्य व फलोत्पादन विभागाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे उद्यानात वाढलेले गवत व झुपडे तशीच असून साप व अन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या कारणामुळे महांतेशनगर परिसरातील नागरिकांनी उद्यानात मॉर्निक वॉकसाठी जाणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून त्या ट्रॅकचा वापरच झालेला नाही. याबाबतच्या तक्रारीची दखल घेत माजी नगरसेवक नाशीपुडी यांनी उद्यानाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. गवत कापणी यंत्र आणून त्यांनी गवत हटविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

येत्या चार दिवसांत स्वच्छता काम पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. उद्यानाच्या दुरावस्थेबद्दलची दखल घेतली जाणार नसल्याची खात्री असल्यामुळे नाशीपुडी यांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला.

उद्यान तब्बल एक एकर जागेत असून उद्याननिर्मिती व सुधारणामागचा उद्देशच सफल होत नसल्याचे नाशीपुडी यांचे म्हणणे आहे. नाशीपुडी हे मार्च २०१९ पर्यंत या विभागाचे नगरसेवक होते. त्यावेळीही त्यांनी अनोखे आंदोलन करुन महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सातत्याने केला. पाण्याच्या टाकीत बसून, अर्धनग्न अवस्थेत बर्फाच्या लादीवर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे महापालिका वर्तुळात ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली, पण त्यांचा पराभव झाला. मात्र, अनोखे आंदोलन करुन त्यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महापालिकेवर सध्या प्रशासक असून ते याकडे लक्ष देणार का, हे पाहावे लागणार आहे.

loading image
go to top