
कोल्हापूर - गुणवंत विद्यार्थी घडविणारे राजाराम महाविद्यालय ऑक्सफर्ड विद्यापीठ असून, या महाविद्यालयाचा अभिमान बाळगावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी येथे केले.
राजाराम महाविद्यालयच विद्यार्थ्यांचे ऑक्सफर्ड - डॉ. पवार
कोल्हापूर - गुणवंत विद्यार्थी घडविणारे राजाराम महाविद्यालय ऑक्सफर्ड विद्यापीठ असून, या महाविद्यालयाचा अभिमान बाळगावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी येथे केले.
राजाराम महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय राजाराम महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘हुशार विद्यार्थ्यांना घडविणारे महाविद्यालय, अशी राजाराम महाविद्यालयाची ओळख आहे. अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी महाविद्यालयातून घडले आहेत. महाविद्यालयात स्नेहसंमेलनासाठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी संप केला होता. माजी प्राचार्य खर्डेकर यांनी आपले वेतन विद्यार्थ्यांसाठी खर्च केले होते. असे प्राचार्य फक्त राजाराम महाविद्यालयाचा असू शकतात. विद्यार्थ्यांच्या आगाऊपणाबद्दल त्यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. त्याच विद्यार्थ्यांनी खर्डेकर सरांची माफी मागून त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावला होता. हे राजारामीयनच करू शकतो.’’
प्राचार्य डॉ. ए. एस. खेमनार यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतला. माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, बालकल्याणचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, डॉ. विजयकुमार माने, प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. डॉ. संजय पठारे, अविनाश देशमुख, डॉ. एस. एस. गाडे उपस्थित होते. शशिकांत पाटील, जयदीप मोहिते, प्रवीण खडके, शशांक पाटील, जबीन शेख, अपर्णा पाटील, मिलिंद दीक्षित, सुनील हावळ, हेमंत पाटील, श्रीकांत सावंत यांनी संयोजन केले. अमृता कदम, स्वराली कडू यांनी नृत्य सादर केले. डॉ. अनिता बोडके यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी सूत्रसंचालन केले.
महाविद्यालयाला ग्रंथभेट...
डॉ. पवार म्हणाले, ‘‘संयोजकांनी मला किती मानधन घेणार? असे विचारले. त्यावेळी माझे महाविद्यालय आहे. मला मानधन नको, असे सांगून त्यांनी महाविद्यालयाला स्वलिखित व संपादित ग्रंथ भेट दिले. या वेळी त्यांनी दिलेल्या आठवणींना विद्यार्थ्यांनी टाळ्या व शिट्यांची दाद दिली.