अणुऊर्जा समजावून सांगितली तरच मान्यता : डॉ. शिवराम भोजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अणुऊर्जा फार प्रचंड असून ती हजारो वर्षे पुरेल इतकी आहे.लोकांना इतर ऊर्जा समजतात, परंतु अणुऊर्जा समजावून सांगितली तरच तिला मान्यता मिळेल, असे मत अणुशास्त्रज्ज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी येथे व्यक्त केले.

सांगली : अणुऊर्जा फार प्रचंड असून ती हजारो वर्षे पुरेल इतकी आहे. त्यांच्या संशोधनात भारतासह पाच-सहा राष्ट्रे आहेत. अणुऊर्जेने कोणताही गॅस निर्माण होत नसून ग्लोबल वार्मिंगला आळा बसू शकतो. अणुभट्टी बांधण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आणि भांडवल जास्त लागते. लोकांना इतर ऊर्जा समजतात, परंतु अणुऊर्जा समजावून सांगितली तरच तिला मान्यता मिळेल, असे मत अणुशास्त्रज्ज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी येथे व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. पी.बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने डॉ. भोजे यांना शांतिनिकेतन लोकविद्यापीठात "कर्मयोगी' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. फोरमचे अध्यक्ष इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष व साहित्यिक उत्तम कांबळे, गौतम पाटील, सनतकुमार आरवाडे, सौ. उमा भोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. भोजे म्हणाले,""अणुचा पहिला वापर 1938 मध्ये झाला. नंतर त्याचा वापर विध्वंस करण्यासाठी अमेरिकेने महायुद्धात जपानवर बॉंब टाकला. नंतर रशियाने अणुसंयंत्र बनवले. इतर देशांनी संशोधन सुरू केले. अणुऊर्जेचा शांततेसाठीही वापर सुरू झाला. चीनमध्ये 1600 मेगावॉटची सर्वात मोठी भट्टी आहे. वीजनिर्मिती, उष्णता निर्मितीसाठी वापर होऊ शकतो. आज 31 देशांत 438 अणुसंयंत्र असून साडे दहा टक्के ऊर्जा निर्मिती होऊ शकते. रशिया आणि जपानमधील अणुभट्टी दुर्घटनेनंतर अज्ञानातून अणुविध्वंसक रूप धारण करू शकतो म्हणून विरोध होऊ लागला आहे.'' 

ते पुढे म्हणाले,""अणुऊर्जा संशोधनात मी 40 वर्षे कार्यरत आहे. अणुऊर्जेचे वैशिष्ट्य म्हणजे ती फार प्रचंड आहे. त्याचे क्‍लिष्ट विज्ञान तंत्रज्ञान सर्वांना समजण्याची गरज आहे. तरच अणुऊर्जा निर्मितीला मान्यता मिळेल. सौर ऊर्जा, पवनऊर्जेचा वापर भविष्यात वाढेल. परंतु ती केव्हाही मिळत नाही. त्यासाठी ती साठवून ठेवावी लागेल. जगभरातील 770 कोटी लोकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी खूप मोठी ऊर्जा आवश्‍यक आहे. अणुऊर्जा, सोलर आणि पवनऊर्जा शुद्ध म्हणून ओळखली जाते. लोकांनी देखील ऊर्जेचा अपव्यय टाळला पाहिजे. वीज बचत महत्त्वाची आहे. ऊर्जेचा वापर काटकसरीने केला नाहीतर पृथ्वीवर राहणे मुश्‍कील होईल.'' 

डॉ. पवार म्हणाले,""डॉ. भोजे यांचा आजचा सत्कार म्हणजे केवळ व्यक्तिगत सत्कार नसून विज्ञानाचा सत्कार आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सत्कार म्हणावा लागेल. त्यांचा सत्कार करून काम संपणार नसून जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करणे आवश्‍यक आहे.'' 

श्री. कांबळे म्हणाले,""डॉ. भोजे यांनी त्यांच्या गावाचे ग्लोबलायझेशन केले आहे. अणुऊर्जा लोकहितासाठी त्यांनी वापरात आणली. माती आणि माणसे विकसित केली.'' 
गौतम पाटील यांनी स्वागत केले. धनंजय माने, डॉ. प्रभा पाटील यांनी मानपत्र वाचन केले. डॉ. भोजे यांच्या आई कोंडूबाई यांचाही सत्कार करण्यात आला. हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी, शिवाजीराव पवार, गौतमीपुत्र कांबळे, ब्रिगेडियर सुरेश पाटील, बाबुराव गुरव, स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, जयराम कुष्टे, श्रीनिवास डोईजड, कुबेर मगदूम यावेळी उपस्थित होते. सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तानाजीराव मोरे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr shivram bhoje seech in atomic energy in sangali