धक्कादायक ! सुट्टीसाठी चालकाने केला मालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

प्रकाश मगदुम यांचे तोडणी केलेला उसाची उचल करणारे यंत्र आहे. (केन हारवेस्टींग मशीन)  त्यांनी बैलहोंगल तालुक्‍यातील करीकोप्प गावात हे यंत्र कामाला लावले आहे. गेल्या आठ दिवसपासून दत्ता पाटकर हा यंत्रावर चालक म्हणून कामाला होता.

बेळगाव / कोल्हापूर - सुट्टी दिली नाही म्हणून रागाच्या भरात चालकाने मालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. रविवारी (ता. 8) सकाळी सहाच्या सुमारास बैलहोंगल तालुक्‍यातील अनगोळ वक्‍कुंद रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीसात झाली आहे.

प्रकाश रामचंद्र मगदुम ( 55, रा. माजगाव ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) असे मृत मालकाचे नाव आहे. तर बापू राजेंद्रअण्णासो गावडे (वय 30. रा. पलटण जि. औरगांबाद) असे जखमीचे नाव आहे. या घटनेनंतर सशयित मारेकरी दत्ता पाटकर (वय 54, रा. पातरट्टी जि. नगर) हा फरारी झाला आहे. 

हेही वाचा - अजब ! राधानगरी, तिलारी जंगलातील ट्रॅप कॅमेरेच चोरीस 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 

प्रकाश मगदुम यांचे तोडणी केलेला उसाची उचल करणारे यंत्र आहे. (केन हारवेस्टींग मशीन)  त्यांनी बैलहोंगल तालुक्‍यातील करीकोप्प गावात हे यंत्र कामाला लावले आहे. गेल्या आठ दिवसपासून दत्ता पाटकर हा यंत्रावर चालक म्हणून कामाला होता. संशयीत दत्ता हा मालकाकडे सुट्टी देण्याची मागणी करीत होता. मात्र, मालकाने त्याला नकार दिला होता. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दत्ता कोणालाही न सांगता कामावरुन निघुन गेला होता. ही बाब मालकाच्या निदर्शनास येताच प्रकाश मगदुम हे बापू गावडे यांना सोबत घेऊन मोटारीतून चालकाला शोधण्यासाठी निघाले होते.

हेही वाचा - दुध उत्पादकांसाठी खुशखबर; अकरा डिंसेबरपासून खरेदी दरात वाढ 

गाडीतच पाठीमागून हल्ला

सकाळी सहाच्या सुमारास चालक अनगोळनजिकच्या कमानीनजिक आढळून आला. त्यामुळे त्याला अडवून त्याची मनधरणी करण्यात आली. दुसरा चालक कामावर येईपर्यंत चार दिवस यंत्र चालव म्हणून त्याला मोटारीत बसण्यास सांगीतले. त्यानंतर तो मागच्या शिटवर बसला. प्रकाश मोटार चालवत होते. तर बापू त्यांच्या बाजुच्या शीटवर बसले होते. मोटार अनगोळपासून एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर संशयित दत्ताने मोटार सुरु असतानाच प्रकाश यांच्यावर मानेवर तसेच इतर ठिकाणी चार पाच वेळा चाकूने हल्ला केला. वर्मी वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापू यांच्यावर देखील त्याने हल्ला केल्याने ते ही जखमी झाले. चालकाचे मोटारीवर नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या बाजुला जाऊन बंद पडली. हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरुन पलायन केले. दरम्यान दोघा जखमींना बैलहोंगल येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकाश यांचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver Kills Owner For Holiday Incidence In Karnataka