दुष्काळी हिंगणगावला सापडली सात फूट मगर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

दुष्काळी कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हिंगणगाव परिसरातील उसाचा फडात तब्बल सात फुटाची मगर आढळली. ती वनविभागाचे पथक आणि स्थानिक तरुणांनी पकडली. गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे भागातील नद्यांना पूर आला होता. त्यातूनच मगर आली असावी, असा एक प्राथमिक अंदाज आहे. या भागात पहिल्यांदाच मगर आढळून आली असून ती पकडली गेल्याने ग्रामस्थांनी निश्‍वास सोडला. 

रांजणी (सांगली) ः दुष्काळी कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हिंगणगाव परिसरातील उसाचा फडात तब्बल सात फुटाची मगर आढळली. ती वनविभागाचे पथक आणि स्थानिक तरुणांनी पकडली. गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे भागातील नद्यांना पूर आला होता. त्यातूनच मगर आली असावी, असा एक प्राथमिक अंदाज आहे. या भागात पहिल्यांदाच मगर आढळून आली असून ती पकडली गेल्याने ग्रामस्थांनी निश्‍वास सोडला. 

अग्रण धूळगाव, हिंगणगाव, विठूरायाचीवाडी परिसरात या मगरीचा वावर दिसत होता. त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते. गेल्या चार दिवसापासून ही चर्चा होती. गावातील तरुण सगळीकडे फिरून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करत होते. आज सकाळी मगर उसाच्या फडात जात असल्याचे आकाश लोंढे याला दिसले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गाव तिकडे लोटले. सदरची माहिती गावातील तरुणांना देण्यात आली. गावातील तरुण गोळा झाले. त्यांनी सांगली येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक बोलावले. 

गावातील तरुण व वनविभागाच्या पथकाने उसाचा फड पिंजून काढला. अखेर एका सरीमध्ये मगर पडलेली आढळून आली. ती मोठ्या प्रयत्नाने पकडून बाहेर नेली गेली. मगर पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. मगर सात फूट लांब व अंदाजे दीडशे किलो वजनाची असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी अग्रण धुळगाव येथे पोतदार वस्तीनजीक मगर आढळून आली होती. पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला होता, परंतू तो निष्फळ ठरला होता. 

मगर जिवंत पकडली असून ती आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. ही मगर पकडण्यासाठी हिंगणगाव, विठूरायाची वाडी, अग्रण धुळगाव गावातील धाडसी तरुणांनी वनपरिक्षेत्राचे अधिकारी बाबुराव शिंदे, रावसाहेब चौगुले, दत्तात्रय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Hingangaon found a seven-foot crocodile