चवीचे खाणार त्याला ड्रायफ्रुटस्‌ मिळणार

अमोल सावंत - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर बाजारातील दर (प्रति किलो रुपये)

 बदाम : ६८० 
 पिस्ता : ९००
 काजू : ९००
 सुकविलेले अंजीर : ६५०
 मनुका : १८० 
 जर्दाळू : ११०० 
 खारीक : ३०० ते ५०० 
 खजूर : १०० ते ३०० 
 अक्रोड : ९०० ते १३०० 

कोल्हापूर - कधी काळी सणासुदीला पाव तोळा, एक तोळा, ५० ग्रॅम किंवा १०० ग्रॅम ड्रायफ्रुटस्‌ खरेदी केले जायचे. शिरा, खीर किंवा फराळात कुठेतरी ड्रायफ्रुटस्‌चे तुकडे दिसत असत. अनेकदा ड्रायफ्रुटस्‌ची जागा गरिबांचा बदाम म्हणून ओळख असलेला शेंगदाणाच भरून काढत असे. ड्रायफ्रुट खाणे म्हणजे श्रीमंतांचे काम, असा समज बहुतेक घरांमध्ये असायचा. आज मात्र ही परिस्थिती निश्‍चितच नाही. विविध उद्योग, रोजगार, आर्थिक क्षमतेतील वाढीमुळे प्रत्येकाची महिन्याला ड्रायफ्रुट घेऊन खाण्याची ऐपत वाढली आहे. इतकेच नव्हे; तर किराणा मालाच्या यादीत हटकून ड्रायफ्रुटस्‌चा समावेश केला जाऊ लागला आहे. 

कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील ड्रायफ्रुटस्‌च्या बाजारपेठेतील वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपये असून अनेकांच्या हातालाही रोजगार मिळाला आहे. आश्‍चर्य म्हणजे ड्रायफ्रुटस्‌चा सर्वाधिक खप हा ग्रामीण भागात वाढल्याचे अनेक होलसेलर्सनी सांगितले. कोल्हापुरात पूर्वी ड्रायफ्रुटस्‌ महापालिका बिल्डिंगसमोर, पानलाईन किंवा जनता बझारमध्ये मिळत असत. ग्रामीण भागात हे प्रमाण तुरळक होते. आज वेगाने विस्तारलेल्या बाजारपेठेमुळे शहरातील मॉल्स, मार्टस्‌, बझार, किरकोळ विक्रेते, किराणा मालाची दुकाने, आऊटलेटस्‌ आदी ठिकाणी ड्रायफ्रुटस्‌ सर्व सिझनमध्ये मिळत आहेत. डॉक्‍टर्स, आहारतज्ज्ञांकडूनही पूरक आहारासाठी ड्रायफ्रुटस्‌चा आग्रह धरण्यात येत आहे. विशेषत: शाकाहारी, गरोदर माता, लहान मुले, विद्यार्थी, खेळाडूंना आपला स्टॅमिना व्यवस्थित राखण्यासाठी पूरक आहार म्हणून ड्रायफ्रुटस्‌ खरेदीत वाढ झाली आहे. गांधीनगरसह कोल्हापुरात नवी दिल्ली, मुंबईहून मोठ्या प्रमाणात माल येतो; तर काजू हा कोकण, चंदगड, आजरा, तुर्केवाडीहून; बेदाणे तासगाव, पंढरपूर, नाशिकहून येतात. कोल्हापुरात पाच होलसेलर्स आहेत.   
 

एक नजर ड्रायफ्रुटस्‌वर

 २०२० पर्यंत भारतीय बाजारपेठेतील वार्षिक उलाढाल १५ हजार कोटी (४,५०,००० टन)  आयात, प्रक्रिया, होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या संख्येत वाढ 
 ३० हजार कोटींची उद्योग क्षमता विकसित 
 भारतात काजूचा वार्षिक वापर हा एक लाख ६० हजार टन तर बदामाचा वापर ५६ हजार टन 
 अन्य स्नॅक्‍स, केक्‍स्‌, चॉकोलेटस्‌, डेझर्टस्‌, मिठाई, एनर्जी बार, चिवडा, फरसाणमध्ये वाढता वापर
 भारतात प्रतिव्यक्ती वापर हा १०० ग्रॅम तर अमेरिकेत जास्त आहे.

कोल्हापूर बाजारातील दर (प्रति किलो रुपये)

 बदाम : ६८० 
 पिस्ता : ९००
 काजू : ९००
 सुकविलेले अंजीर : ६५०
 मनुका : १८० 
 जर्दाळू : ११०० 
 खारीक : ३०० ते ५०० 
 खजूर : १०० ते ३०० 
 अक्रोड : ९०० ते १३०० 

यावर्षी जर्दाळूचे पीक अफगाणिस्तानमध्ये कमी प्रमाणात आल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. गतवर्षी जर्दाळू प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपये होता. यावर्षी ही वाढ ११०० रुपयांपर्यंत झाली. ड्रायफ्रुटस्‌ची रेंज ही १०० ते एक हजार रुपयांपर्यंत असली तरी हमखास खरेदी करणाऱ्यांच्या तसेच दररोज ड्रायफ्रुटस्‌चा आहारात समावेश करणाऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे, हे महत्त्वाचे.  
- चिंतन शहा,  शाह घनशामदास कांतीलाल 

अन्य ड्रायफ्रुटस्‌च्या तुलनेत कोल्हापूरमध्ये बदाम, काजू, काळ्या मनुका, अक्रोड, पिस्ताला खूप मागणी आहे. पूर्वी आमच्याकडे आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली आहे, असेच लोक खरेदीसाठी येत असत. आता मात्र ही परिस्थिती खूप बदलली आहे. श्रीमंतांबरोबर मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, बेताची परिस्थिती असलेले लोकही ड्रायफ्रुटस्‌ खाण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत.
- उदय कामत, श्री महालक्ष्मी ट्रेडर्स (शाहूपुरी) 

Web Title: Dry frutas kolhapur